अनुपम खेर बॉलिवूडमधल्या अष्टपैलू अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी हिंदी, इंग्रजीसह अन्य भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केले आहे. अनुपम खेर हे सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या सेलिब्रिटींपैकी एक आहेत. ते त्यांच्या आयुष्यातील महत्वाच्या घडामोडी चाहत्यांशी वरचेवर शेअर करत असतात. तसेच समाजिक प्रश्नांवरही भाष्य करताना ते दिसतात. नुकतीच त्यांनी ‘द कपिल शर्मा शो’मध्ये हजेरी लावली आणि त्यावरून त्यांना चांगलेच ट्रोल केले जात आहे.

अभिनेते अनुपम खेर लवकरच ‘ऊंचाई’ या चित्रपटात दिसणार आहेत. यानिमित्त त्यांनी नुकतेच ‘द कपिल शर्मा शो’च्या आगामी एपिसोडचे शूटिंग केले. यावेळेचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोंमध्ये ते कपिल शर्माबरोबर पोज देताना दिसत आहे. अनुपम खेर यांनी कॅप्शनमधून ‘द कपिल शर्मा’शोमध्ये आमंत्रित केल्याबद्दल त्याचे आभार मानले आहेत. पण अनुपम खेर यांची ही पोस्ट पाहून काही चाहते संतापले आहेत.

आणखी वाचा : आलियाच्या होणाऱ्या बाळासाठी दीपिका उत्सुक; स्टोरी शेअर करत म्हणाली…

अनुपम खेर काही महिन्यांपूर्वी घडलेल्या गोष्टी विसरून ‘द कपिल शर्मा शो’मध्ये कसे आले असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. या पोस्टवर कमेंट करत अनेकजण राग व्यक्त करत आहेत. तर काहींनी अनुपम खेर यांना काही महिन्यांपूर्वी घडलेल्या घटनांची आठवण करून दिली. अनुपम खेर यांची महत्वपूर्ण भूमिका असलेला ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट मार्च २०२२ मध्ये प्रदर्शित झाला. तेव्हा कपिल शर्माने ‘द कश्मीर फाइल्स’च्या प्रमोशनदरम्यान या चित्रपटाच्या टीमला त्यांच्या शोमध्ये आमंत्रित केले नव्हते. त्यावर अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केली होती.

चाहत्यांनी अनुपम खेर यांना याच घटनेची आठवण करून दिली असून “त्यांच्यासोबत जे काही घडले ते सर्व विसरले का?” असा प्रश्नही नेटकऱ्यांनी त्यांना विचारला आहे. अनुपम खेर यांच्या पोस्टवर एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिले, “कपिल शर्माने ‘द काश्मीर फाईल्स’ला सपोर्ट का केला नाही? बॉलीवूडचा दुटप्पीपणा आणि इथे काम करणाऱ्या लोकांचे दोन चेहरे पाहून मन भरलं आहे आता सर जी.” आणखी एका यूजरने लिहिले की, “कपिलने तुम्हाला ‘द काश्मीर फाईल्स’च्या प्रमोशनसाठी आमंत्रित केले नाही.” अनुपम खेर यांना ‘द कपिल शर्मा शो’मध्ये पाहून चाहते नाखूष आहेत.

मात्र, ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अनुपम खेर यांनी ‘टाइम्स नाऊ’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की ते ‘द काश्मीर फाईल्स’च्या प्रमोशनसाठी कपिल शर्माच्या शोमध्ये का गेले नाहीत. ‘द काश्मीर फाईल्स’ हा एका गंभीर विषयावर बनवण्यात आलेला चित्रपट आहे आणि ‘द कपिल शर्मा शो’ हा विनोदी कार्यक्रम असल्याने त्यांनी कपिलच्या शोमध्ये जाण्यास नकार दिला होता.

हेही वाचा : काश्मीरमध्ये अनुपम खेर आईसाठी घर विकत घेणार, लेकाने वचन देताच दुलारी झाल्या भावूक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अनुपम खेर यांचा ‘ऊंचाई’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये त्यांच्यासह अमिताभ बच्चन, बोमन इराणी, नीना गुप्ता, डॅनी डॅन्झोपा हे कलाकार दिसणार आहेत. राजश्री फिल्म्सच्या सूरज बरजातिया यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. चार जिवलग मित्रांची कथा सांगणारा हा चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला होता. सध्या चित्रपटाची टीम प्रमोशनल कार्यक्रमांमध्ये व्यस्त आहे.