‘सूर नवा ध्यास नवा’ हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक आहे. आतापर्यंत या कार्यक्रमाची पाच पर्व सुपरहिट झाली. तर आता लवकरच ‘सूर नवा ध्यास नवा’चं ‘सुर नवा ध्यास नवा- आवाज तरुणाईचा’ हे सहावं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या पर्वामध्ये अभिनेत्री रसिका सुनील ही सूत्रसंचालिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. ती पहिल्यांदाच सूत्रसंचालिका म्हणून काम करणार असल्याने तिचे चाहते प्रचंड आनंदी झाले आहेत. तर या कार्यक्रमासाठी ती किती उत्सुक आहे आणि या कार्यक्रमाच्या सेटवरील वातावरण कसं असतं हे आता तिने ‘लोकसत्ता ऑनलाईन’शी बोलताना सांगितलं आहे.

ती म्हणाली, “या आधी मी ३-३ तासांच्या दोन कार्यक्रमांचं सूत्रसंचालन केलं आहे पण एका रिॲलिटी शोची सूत्रसंचालिका म्हणून काम करण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे. या आगामी पर्वासाठी मी खूप उत्सुक आहे. कारण मी स्वतः अकरावी-बारावीतपर्यंत गाणं शिकत होते. त्यामुळे अवधूत सर आणि महेश सर गाणं झाल्यावर ज्या प्रतिक्रिया किंवा सूचना देतात त्या कशाबद्दल आहेत हे मला गाण्याचा अभ्यास असल्यामुळे थोडं कळतं. मी जशी खऱ्या आयुष्यात आहे तशीच सूत्रसंचालिका म्हणून प्रेक्षकांसमोर येण्याचा माझा प्रयत्न असेल. तर सूत्रसंचालनाबरोबरच माझ्यातले आणखीही काही कलागुण या पर्वाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या समोर येतील.”

हेही वाचा : Video: ‘सूर नवा ध्यास नवा’मध्ये होणार मोठा बदल, स्पृहा जोशीच्या ऐवजी ‘ही’ अभिनेत्री दिसणार सूत्रसंचालिकेच्या भूमिकेत

या कार्यक्रमाच्या सेटवर असणाऱ्या वातावरणाबद्दल ती म्हणाली, “सूर नवा ध्यास नवाची आधीची पर्व मी पाहिली आहेत. या कार्यक्रमाचा त्याचा स्वतःचा एक दर्जा आहे. हा अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमातील गाणी, परीक्षकांच्या कमेंट्स या खूप खऱ्या असतात. तर आता मी पडद्यामागच्या गोष्टी जवळून बघत आहे. यात मला वादकांची, त्यांच्या मेंटॉरची, सगळ्यांचीच मेहनत दिसत आहे. त्यामुळे हा शो इतका लोकप्रिय का आहे हे मला जवळून अनुभवायला मिळतंय.”

आणखी वाचा : “कपड्यांवरून बोल्डनेस ठरवणं…” अभिनेत्री रसिका सुनीलने मांडलं रोखठोक मत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे ती म्हणाली, “अवधूत गुप्ते आणि महेश काळे यांच्याबरोबर हे माझं खूप छान बॉण्डिंग तयार झालं आहे. अवधूत दादा खूप मजा मस्ती करत असतोच हे आपल्याला कार्यक्रमात पाहायला मिळतंच. त्यामुळे परीक्षक आणि सूत्रसंचालक यांमधील गमती जमती पहिल्या भागापासूनच प्रेक्षकांना पाहायला मिळतील. त्याशिवाय महेश दादा जितका सिरीयस आहे तितकाच तो मस्तीही करू शकतो आणि त्याचीही बाजूही प्रेक्षकांसमोर आणण्याचा सूत्रसंचालिका म्हणून मी प्रयत्न करेन. पण ते दोघेजण ज्या प्रकारे गाण्याकडे बघतात, गाण्यावर प्रतिक्रिया देतात ते स्पर्धकांना खूप शिकवून जाणारं असतं आणि त्याचा मलाही नक्कीच फायदा होईल. त्यामुळे मी प्रचंड उत्सुक आहे.” ‘सूर नवा ध्यास नवा’चं हे आगामी पर्व ७ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांना ‘कलर्स मराठी’वर पाहायला मिळेल.