‘बिग बॉस’ मराठीचं चौथं पर्व आता संपत आलं आहे. या घरात प्रेम, भांडण, वाद, मारामारी हे सगळंच पहायला मिळालं. या पर्वामध्ये रुचिरा जाधव आणि डॉ. रोहित शिंदे ही जोडी एकत्र सहभागी झाली होती. सुरुवातीला गोडीगुलाबीने वावरणाऱ्या या जोडीमध्ये हळूहळू मतभेद व्हायला लागले. या वादांनंतर आधी रुचिरा जाधव ही घराबाहेर पडली. त्यानंतर काही आठवड्यांनी रोहित शिंदे हा बाहेर पडला. घराबाहेर पडल्यानंतरही सोशल मीडियावर त्यांच्यातला वाद हा चांगलाच रंगला होता. पण आता त्यांच्यातला हा वाद मिटला आहे.
‘बिग बॉस ४’चा महाअंतिम सोहळा उद्या रंगणार आहे. त्यानिमित्त ‘बिग बॉस’च्या घरात एक रियुनियन आयोजित करण्यात आलं होतं. या रियुनियनमध्ये या पर्वातील सर्व स्पर्धक सहभागी झाले. यावेळी रुचिरा आणि रोहितही होते. या वेळेचा एक प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
बिग बॉसच्या या पर्वामध्ये या दोघांमध्ये वादाची चांगलीच ठिणगी पडल्याचं पाहायला मिळालं. रूचिराने सोशल मीडियावरूनही रोहितला अनफॉलो केलं होतं. त्यानंतर ते दोघे ब्रेकअप करणार अशा चर्चा सर्वत्र रंगल्या. दरम्यान रुचिराने वेळ मागितला आहे, असं रोहितने जाहीर केलं होतं. ते दोघं आपला रस्ता वेगळे करतील की त्यांचं नातं पूर्ववत होईल याकडे सर्वांचेच लक्ष लागलं होतं. आता व्हायरल झालेल्या ‘बिग बॉस’च्या नव्या प्रोमोमध्ये याचं उत्तर मिळालं आहे.
हेही वाचा : “तू सत्य मानणार नाहीस आणि…” रुचिरा जाधवची ‘ती’ पोस्ट चर्चेत
‘बिग बॉस’ने आयोजित केलेल्या रियुनियनमध्ये सर्व स्पर्धक पुन्हा एकत्र आले आणि एकमेकांमध्ये मिसळून, एकमेकांशी गप्पा मारून त्यांनी छान हसत खेळत वेळ घालवला. पण रोहित आणि रुचिरा यांच्यात अबोला दिसला. त्यामुळे त्यांच्यातलं भांडण मिटवण्यासाठी प्रसाद पुढे आला. सर्व गैरसमज विसरून एक व्हा असं सांगत त्याने त्या दोघांना एकमेकांना खीर भरवण्याचा आग्रह केला. त्याप्रमाणे या ती दोघं एकमेकांना खीर भरवत त्यांच्यातला अबोला मिटवताना दिसत आहेत. बिग बॉसच्या घरात मतभेद झाल्यानंतर बिग बॉसच्याच घरात आता ही दोघं पुन्हा एकदा एकत्र आलेली पाहायला मिळाली.