‘स्टार प्रवाह’ वाहिनी लवकरच एक नवी मालिका प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. या मालिकेत अभिनेत्री समृद्धी केळकर व अभिनेता अभिषेक रहाळकर मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. ‘हळद रुसली कुंकू हसलं’ असं या मालिकेचं नाव आहे. यामधून समृद्धी व अभिषेक पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. दोघांनीही यापूर्वी ‘स्टार प्रवाह’ मालिकांमध्ये काम केलं आहे.
‘हळद रुसली कुंकू हसलं’ या मालिकेचा तीन दिवसांपूर्वी ‘स्टार प्रवाह’ने सोशल मीडिया पेजवरून पहिला प्रोमो शेअर केला होता. या प्रोमोला ‘ती अस्सल गावरान, तो पक्का शहरी’ असं कॅप्शन देण्यात आलं होतं. ‘स्टार प्रवाह’ने शेअर केलेल्या प्रोमोमधून अभिषेक हा शहरातून आलेला मुलगा तर समृद्धी ही गावा खेड्यातील मुलगी असते, असं काहीचं चित्र पाहायला मिळतं. परंतु, या प्रोमोमधील अजून एका गोष्टीने सर्वाचं लक्ष वेधलं, ती म्हणजे समृद्धीसह असलेली तिची गाय. समृद्धीचं तिच्या गायीसह घट्ट नातं असून ती तिची मैत्रीण असते, जिचं नाव स्वाती असं असल्याचं प्रोमोमधून पाहायला मिळतं. अशातच आता अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टला तिने ‘मी आणि माझी स्वाती’ असं कॅप्शन दिलं आहे आणि कसा वाटला प्रोमो, असा प्रश्नही तिने तिच्या चाहत्यांना विचारला आहे.
समृद्धी व अभिषेक या मालिकेसाठी कोल्हापुरात शूटिंग करत आहेत. अभिनेत्रीने शेअर केलेल्या पोस्टमधून ते शूटिंग करत असलेल्या परिसरातील दृश्य पाहायला मिळत आहे. यामध्ये तिने तिची मैत्रीण स्वातीबरोबरचे काही गोड फोटो शेअर केले आहेत. समृद्धीचं मालिकेत तिच्या स्वातीबरोबर घट्ट नातं असून ती तिच्यासाठी खूप महत्त्वाची असल्याचं प्रोमोमधून पाहायला मिळतं. या मालिकेत समृद्धीचा साधा लूक लक्ष वेधून घेत आहे, कारण यामध्ये तिने गावाकडे लोक शेतात काम करताना काही स्त्रिया शर्ट घालून काम करतात तसं शर्टही घातलेलं दिसत आहे; तर अभिषेक हा शहरी मुलाप्रमाणे तशाच लूकमध्ये दिसतोय.
‘हळद रुसली कुंकू हसलं’ ही मालिका ‘स्टार प्रवाह’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. पण, ही मालिका नेमकी कधीपासून सुरू होणार हे अद्याप ‘स्टार प्रवाह’ने जाहीर केलेलं नाही. समृद्धी व अभिषेक यांच्यासह ‘हळद रुसली कुंकू हसलं’ या मालिकेत कोणत्या कलाकारांची वर्णी लागणार हे पाहणं रंजक ठरेल.