सध्या संपूर्ण देशभरात दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. मनोरंजनविश्वातील कलाकार सुद्धा सणासुदीला शूटिंगमधून ब्रेक घेत आपल्या कुटुंबासह वेळ घालवतात. दिवाळीचा सण म्हणजे आपलेपणाचा, प्रेमाचा आणि आपल्या कुटुंबीयांसह वेळ घालवण्याचा आनंददायी अनुभव. ‘झी मराठी’च्या ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेत सावलीची मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री प्राप्ती रेडकरने यानिमित्ताने तिच्या बालपणीची खास आठवण सर्वांना सांगितली आहे.

प्राप्ती रेडकर म्हणते, “जर सुट्टी मिळाली तर मी माझ्या आई- वडिलांबरोबर दिवाळी साजरी करेन. माझ्या लहानपणीची एक खास आठवण आहे ती म्हणजे माझ्या नानीच्या घरी आम्हा लहान मुलांमध्ये दरवर्षी पहाटे ४ वाजता कोण पहिला फटाका फोडणार याची स्पर्धा असायची. आई-वडिलांनी आणलेले नवीन कपडे घालून मरीन लाइन्सला जाणं, हे माझ्यासाठी फार जिव्हाळ्याचं आहे.”

“पण, गेल्या ५ वर्षांपासून मी फटाके फोडणं थांबवलं आहे कारण, वायूप्रदूषण खूप होतं. म्हणूनच हा निर्णय मी निसर्गाच्या दृष्टीकोनातून घेतला आहे. मात्र दिवाळी साजरी करण्याचे विविध मार्ग आहेत. मी माझ्या कुटुंबाबरोबर एकत्र फराळ करते, सगळ्या नातेवाईकांना भेटते आणि फराळ बनवण्याच्या प्रक्रियेत सहभागी होते… अशाप्रकारे मी माझी दिवाळी साजरी करते.” असं प्राप्तीने सांगितलं.

प्राप्ती पुढे म्हणाली, “माझं व्यक्तिमत्व फुलबाजीसारखं आहे. फुलबाजीप्रमाणे मी ‘तडतड’ करत सेटवर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सतत फिरत असते.”

दरम्यान, प्राप्ती रेडकरने यापूर्वी तिने ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘काव्यांजली’ मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. प्राप्ती सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. वैयक्तिक आयुष्यात ती उत्तम डान्सर सुद्धा आहे. ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेत तिच्यासह साईंकित कामत, सुलेखा तळवलकर, वीणा जगताप, मेघा धाडे, भाग्यश्री दळवी अशा दमदार कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.