छोट्या पडद्यावरील प्रत्येक वाहिन्यांमध्ये सध्याच्या काळात टीआरपीच्या शर्यतीत अग्रेसर राहण्यासाठी चढाओढ सुरू आहे. गेल्या महिन्याभरात विविध वाहिन्यांवर अनेक नवनवीन मालिकांची घोषणा करण्यात आली. सध्या ‘स्टार प्रवाह’ वाहिनी ‘ठरलं तर मग’, ‘प्रेमाची गोष्ट’, ‘लक्ष्मीच्या पावलांनी’, ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकांमुळे टीआरपीच्या शर्यतीत आघाडीवर आहे. याशिवाय येत्या काळात ‘येड लागलं प्रेमाचं’ व ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ या दोन नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या दोन्ही मालिकांमध्ये आघाडीचे कलाकार झळकणार आहेत. त्यामुळे २७ मे पासून ‘स्टार प्रवाह’च्या एका मालिकेची वेळ बदलण्यात येईल असं बोललं जात आहे.
‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर ‘येड लागलं प्रेमाचं’ ही नवीन मालिका २७ मे पासून सुरू करण्यात येणार आहे. या मालिकेत प्रेक्षकांना विशाल निकम आणि पूजा बिरारी यांची फ्रेश जोडी पाहायला मिळणार आहे. ही मालिका रात्री १० वाजता प्रसारित केली जाणार आहे. सध्या ‘स्टार प्रवाह’वर दहा वाजता ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही लोकप्रिय मालिका प्रसारित केली जाते. परंतु, आता वाहिनीकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेची वेळ बदलण्यात येणार आहे. मराठी सिरियल ऑफिशियल या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर केलेल्या माहितीनुसार नव्या मालिकेमुळे सध्या चालू असलेली ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका १० वरून ११ च्या स्लॉटला शिफ्ट करण्यात येणार आहे. तर, अकरा वाजता प्रसारित केली जाणारी ‘पिंकीचा विजय असो!’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
हेही वाचा : “अवॉर्ड्स विकले जातात का?” सिद्धार्थ चांदेकरने मांडलं स्पष्ट मत; म्हणाला, “मला सत्य परिस्थिती…”
‘स्टार प्रवाह’वर २७ मे पासून ‘येड लागलं प्रेमाचं’ ही नवीकोरी मालिका रात्री १० वाजता, ‘अबोली’ रात्री १०.३० वाजता, तर ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ रात्री ११ वाजता प्रसारित केली जाईल आणि ‘पिंकीचा विजय असो!’ मालिका बंद होणार आहे.
हेही वाचा : “पप्पा, तुम्ही एवढी वर्षे…”, वडिलांच्या वाढदिवशी शिवानी रांगोळेची खास पोस्ट; मास्तरीणबाई म्हणाल्या…
दरम्यान, ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेबद्दल सांगायचं झालं, तर प्रेक्षकांना यात राया व मंजिरीची अनोखी गोष्ट पाहायला मिळेल. महाराष्ट्राचं कुलदैवत अशी ओळख असणाऱ्या विठुरायाच्या पंढरपूर नगरीत या मालिकेची गोष्ट घडणार आहे. अभिनेता विशाल निकम ‘राया’च्या भूमिकेत तर, मंजिरीच्या भूमिकेत पूजा बिरार झळकणार आहे.