अभिनेत्री प्राची पिसाटने काही दिवसांपूर्वी अभिनेते सुदेश म्हशिलकर यांच्या फेसबुक अकाऊंटवरून आलेल्या आक्षेपार्ह मेसेजचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केले होते. यानंतर मराठी मनोरंजन विश्वात एकच खळबळ उडाली होती. सुदेश म्हशिलकरांवर अनेक कलाकारांकडून टीका करण्यात आली होती. मात्र, एवढे दिवस त्यांनी या प्रकरणावर काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती.

आता जवळपास पाच दिवसांनी सविस्तर पोस्ट शेअर करत सुदेश म्हशिलकरांनी आपली बाजू स्पष्ट केली आहे. याशिवाय त्यांचं फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याची तक्रार भाईंदर पोलीस ठाण्यात दिल्याचं त्यांनी या पोस्टमध्ये नमूद केलं आहे. तक्रारीची लेखी प्रत देखील अभिनेत्यांनी सर्वांबरोबर शेअर केली आहे.

सुदेश म्हशिलकरांनी त्यांच्या पोस्टमध्ये एकूण सहा मुद्दे सांगितले आहेत. या पोस्टमध्ये त्यांनी नेमकं काय म्हटलंय सविस्तर जाणून घेऊयात…

अभिनेते सुदेश म्हशिलकरांची पोस्ट

खरंतर मी या विषयावर काहीही लिहिणार नव्हतो. पण गेले काही दिवस जे काही सोशल मीडियावर सुरू आहे, त्यावर अनेक लोकांचे, मीडियाचे प्रतिसाद पाहून शांत बसणं मला शक्य झालं नाही. म्हणून आज इथे माझं म्हणणं मुद्द्यांनुसार मांडत आहे.

1) “हा मेसेज खरंच मीच केला का?”
तो मेसेज माझ्याच अकाउंटवरून गेला आहे. पण तो नेमका केव्हा? कसा गेला? कोणीतरी अकाउंटमध्ये शिरलं का? की कुठे गैरवापर झाला? याचा मला पत्ता नाही. त्याबाबतीत मी लेखी तक्रार दाखल केली आहे, ती मी इथे जोडत आहे. आणि जर कुणी असं म्हणत असेल की त्यांनी माझं अकाउंट हॅक झालं का ते तपासलं, तर ती अतिशय गंभीर बाब आहे. माझं सोशल मीडिया अकाउंट ही माझी वैयक्तिक माहिती आहे. त्यात परवानगीशिवाय हस्तक्षेप करणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे.

2) “अश्लील मेसेजेस केल्याचा आरोप”
मी इथे माझ्या फोनमधील मूळ चॅट्सचे स्क्रीनशॉट्स जोडत आहे. ज्यामध्ये तुम्हाला स्पष्टपणे हास्यविनोदाच्या स्वरात लिहिलेलं दिसेल. जर खरंच मी असा मेसेज केला असता आणि तो इतका आक्षेपार्ह असता, तर त्यावर प्रतिक्रिया देताना “असं का पाठवलं?” एवढं तरी कुणीही विचारलं असतं.
पण इथे उलट, मेसेजचा संदर्भ तोडून, त्यातून चुकीचा अर्थ लावण्याचा प्रयत्न झाला आहे. लोकांना अर्धवट माहिती देऊन अशाप्रकारे दिशाभूल करणं हे सुद्धा चुकीचं आहे.

3) “फ्लर्टिंगसाठी नंबर मागितला का?”
माझ्या फोनमध्ये ‘Prachi Pisat’ या नावाने आधीच नंबर सेव्ह आहे. मला त्यासाठी फेसबुकवर नंबर मागायची गरजच नव्हती. ज्यादिवशी पोस्ट आली त्यादिवशी शहानिशा करण्यासाठी प्राचीला कॉल केला होता पण तिने घेतलाच नाही.

4) “पाच दिवस उत्तर का दिलं नाही?”
मी फारसा सोशल मीडियावर सक्रिय नसतो. माझं शूटिंग, माझं काम आणि बाकी वेळ माझ्या कुटुंबीयांसोबत जातो. माझी पत्नी कॅन्सर पेशंट आहे, आणि माझी मुलंही याच इंडस्ट्रीत काम करतात. या घटनेमुळे त्यांच्यावर किती मानसिक ताण आला असेल, याची कल्पनाही मला कदाचित करता येणार नाही. हे सगळं पाहून मीही थोडा गोंधळलो होतो. कुठून सुरूवात करावी हे समजत नव्हतं.

5) “प्राचीला कॉल करून पोस्ट काढायला धमकावलं?”
माझ्या काही जवळच्या मित्र-मैत्रिणींनी फक्त काळजीपोटी तिला कदाचित मेसेज किंवा कॉल केला असेल तर मला माहीत नाही. कारण मी स्वतः कुणाला असं करायला सांगितलं नाही.

6) “बाकी पोरींनी सांगितलेले किस्से व्हायरल करण्याची धमकी?”
‘सेक्सी’ म्हणावं असं खरं सौंदर्य आणि समजूत माझ्या आयुष्यातल्या अनेक मैत्रिणींमध्ये आहे. ज्या माझ्या पत्नीला सुद्धा ओळखतात. त्या आजही आवर्जून आमच्याकडे येता.

नेमकं प्रकरण काय आहे?

मराठी अभिनेते सुदेश म्हशिलकर यांच्या फेसबुक अकाऊंटवरून प्राचीला “तुझा नंबर पाठव ना, तुझ्याशी फ्लर्ट करायची इच्छा झालीये कसली गोड दिसते आहेस…हल्ली खूपच सेXX दिसायला लागली आहेस…वाह” असा मेसेज आला होता. प्राचीने याचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केले होते. यानंतर प्राचीला अनेक मराठी कलाकारांनी पाठिंबा देत या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर सुदेश म्हशिलकरांनी सविस्तर पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सुदेश म्हशिलकरांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायंच झालं तर, सध्या ते ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहे. याशिवाय अभिनेत्री प्राची पिसाटने ‘राधा प्रेम रंगी रंगली’, ‘नकळत सारे घडले’, ‘तू चाल पुढे’ अशा अनेक मालिकांमध्ये काम केलेलं आहे.