स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुखं म्हणजे नक्की काय असतं!’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरताना दिसत आहे. या मालिकेतील जयदीप आणि गौरीच्या जोडीने चाहत्यांनी मनं जिकली आहेत. त्यासोबतच या मालिकेत शालिनी, मल्हार, देवकी, दादा, माई यांच्याही भूमिका चांगल्याच गाजताना दिसत आहे. या मालिकेत मल्हार हे पात्र साकारणाऱ्या अभिनेता कपिल होनरावचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने शालिनी फेम अभिनेत्री माधवी निमकरने खास पोस्ट शेअर केली आहे.
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिका टीआरपी रेसमध्ये कायमच टॉप १० मध्ये असल्याचे पाहायला मिळते. या मालिकेतील सर्वच कलाकार सोशल मीडियावर विशेष सक्रिय असल्याचे पाहायला मिळतात. या मालिकेत शालिनीची भूमिका साकारणारी अभिनेत्री माधवी निमकरने इन्स्टाग्रामवर मल्हारसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.
आणखी वाचा : Video : ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ नाटकाचे शरद पोंक्षे फक्त ५० प्रयोग करणार, कारण…
माधवी निमकरची पोस्ट
“आज तुझा वाढदिवस आहे. इतक्या शुभेच्छा आहेत की त्या मला शब्दात मांडता येणार नाहीत. खूप मेहनती आहेस, उत्तम काम करतोस आणि अजून उत्तम काम करायची ताकद तुझ्यात आहे. जेव्हा तुला एखादा सीन आवडत नाही, तेव्हा तू किती अस्वस्थ होतोस ते मी पाहिलं आहे आणि हे अस्वस्थ होणं म्हणजेच उत्तम अभिनेता असण्याचा गुण आहे.
त्याबरोबरच तू एक माणूस म्हणून, मित्र म्हणून किती चांगला आहेस हे माझ्याशिवाय उत्तम कोणी सांगू शकत नाही. मला नेहमी माझ्यात चांगलं काय आणि वाईट काय हे तू दाखवलं आहेस आणि त्याबरोबरच काय चुकीचं आहे, हे देखील सांगितलं आहेस. एक मित्र म्हणून कायम माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलास आणि यापुढेही राहशील याची मला पूर्ण खात्री आहे. खूप मोठा हो, मेहनत कायम ठेव. तू उत्तम काम करत राहशील, याची मला खात्री आहे.
कपिल तुला भरभरुन शुभेच्छा. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. तुला जे जे हवं ते सर्व मिळू दे. खूप खूप प्रेम आणि आशीर्वाद. धमाल कर आणि तुझा दिवस आनंदात घालव”, असे माधवी निमकरने म्हटले आहे.
आणखी वाचा : प्राजक्ता माळीने सांगितली लग्नासाठीची पहिली अट, म्हणाली “तो मुलगा…”
दरम्यान माधवी निमकरची ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. यावर कपिलनेही प्रतिक्रिया दिली आहे. कपिलने वाढदिवसाच्या या पोस्टवर कमेंट करत ‘धन्यवाद’ असे म्हटले आहे. त्याबरोबरच अनेक कलाकारांनीही त्यावर कमेंट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.