New Marathi Serial Promo Tujhyasathi Tujyasang : छोट्या पडद्यावरील विविध मराठी वाहिन्यांवर येत्या काही दिवसांत अनेक नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या नव्या मालिकांमधून काही जुने कलाकार पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. नुकताच सन मराठीवरील एका नव्या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यामध्ये मुख्य भूमिका कोण साकारणार जाणून घेऊयात…
‘कलर्स मराठी’ वाहिनीवर २०१९ मध्ये ‘जीव झाला येडापिसा’ ही मालिका ऑन एअर झाली होती. या मालिकेने जवळपास २ वर्षे रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. घराघरांत ही मालिका पाहिली जायची, महत्त्वाचं म्हणजे शिवा-सिद्धीच्या जोडीला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. या मालिकेत शिवाची मुख्य भूमिका अभिनेता अशोक फळदेसाईने साकारली होती. या मालिकेने २०२१ मध्ये प्रेक्षकांचा निरोप घेतला.
‘जीव झाला येडापिसा’ ही मालिका संपल्यावर मध्यंतरीच्या काळात अशोकने अनेक भूमिका साकारल्या. मात्र, त्याने साकारलेल्या ‘शिवा’ या पात्राची लोकप्रियता आजही सर्वांच्या मनात कायम आहे. आता प्रेक्षकांचा लाडका ‘शिवा’ एका नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशोक फळदेसाईची मुख्य भूमिका असलेल्या ‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं’ या मालिकेचा पहिला प्रोमो नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. ही मालिका ‘सन मराठी’ वाहिनीवर लवकरच प्रसारित केली जाणार आहे.
अभिनेता अशोक फळदेसाईसह या नव्या मालिकेत अभिनेत्री अनुष्का गिते झळकणार आहे. तिने यापूर्वी ‘स्टार प्रवाह’च्या ‘उदे गं अंबे’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. आता ‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं’ या मालिकेच्या निमित्ताने प्रेक्षकांना अशोक ( तेजा ) आणि अनुष्काची ( वैदेही ) फ्रेश जोडी एकत्र पाहायला मिळणार आहे. अशोकला पुन्हा एकदा डॅशिंग भूमिकेत पाहून या प्रोमोवर त्याच्या चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. अनेक मराठी कलाकारांनी या प्रोमोवर कमेंट्स करत या मालिकेच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, ‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं’ या नव्या मालिकेच्या प्रसारणाची वेळ अन् तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. लवकरच ‘सन मराठी’ वाहिनीकडून या नव्या मालिकेचा मुहूर्त जाहीर करण्यात येईल.