Amitabh Bachchan’s Reaction on Sunil Grover mimicry: मनोरंजनसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत, जे त्यांच्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर वर्षानुवर्षे राज्य करतात. अमिताभ बच्चन यांनी बॉलीवूडमध्ये स्वत:ची अँग्री यंग मॅन म्हणून ओळख निर्माण केली.

‘जंजीर’, ‘शोले’, ‘दीवार’, ‘अमर अकबर अँथनी’, ‘अग्निपथ’, ‘डॉन’, ‘काला पत्थर’, ‘सिलसिला’, ‘कभी खुशी कभी ग’, ‘बागबान’, ‘आनंद’, ‘चुपके चुपके’, ‘नमक हराम’, ‘सत्ते पे सत्ता’, ‘पिंक’, ‘पिकू’, ‘ब्लॅक’, ‘काँटे’, ‘बदला’ अशा अनेक चित्रपटातून त्यांनी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले.

आजही वयाच्या ८४ व्या वर्षीही ते विविध भूमिका साकारत प्रेक्षकांच्या भेटीला येतात. सध्या अमिताभ बच्चन कौन बनेगा करोडपती या शोचे सूत्रसंचालन करीत आहेत. या शोमध्ये ते स्पर्धकांशी विविध विषयांवर गप्पा मारतानादेखील दिसतात. अनेकदा ते त्यांच्या आयुष्यातील अनेक किस्से,देखील सांगतात. शोमधील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.

आता अमिताभ बच्चन पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. कौन बनेगा करोडपतीच्या मंचावर असे काही घडले की, अमिताभ बच्चन यांना त्यांचे हसू आवरता आले नाही. कौन बनेगा करोडपती (KBC)च्या आगामी एपिसोडचे काही प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. त्यामध्ये सुनील ग्रोवर व कृष्णा अभिषेकने केबीसीच्या मंचावर हजेरी लावल्याचे दिसत आहे.

सुनील ग्रोवरने केली अमिताभ बच्चन यांची मिमिक्री

एका व्हिडीओमध्ये सुनील ग्रोवरने मेरे हसबंड मुझे प्यार नहीं करते या विनोदी गाण्यावर सादरीकरण करीत असल्याचे दिसत आहे. यावेळी त्याने पांढऱ्या रंगाचा सूट घातला आहे. त्याचा परफॉर्मन्स पाहून तिथे बसलेल्या प्रेक्षकांसह अमिताभ बच्चनही पोट धरून हसत असल्याचे दिसत आहे.

द ग्रेट इंडियन कपिल शोमधील त्याचा सहकलाकार कृष्णा अभिषेकदेखील त्याचा परफॉर्मन्स पाहून हसत असल्याचे दिसत आहे. सुनीलच्या विनोदाच्या अचूक टायमिंगने सर्वांना हसण्यासाठी भाग पाडल्याचे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

आणखी एका व्हिडीओने लक्ष वेधून घेतले आहे. सुनील ग्रोवर त्याच्या मिमिक्रीच्या कलेसाठी लोकप्रिय आहे. या व्हिडीओमध्ये अमिताभ बच्चन यांच्यासमोर सुनील त्यांचीच मिमिक्री करीत असल्याचे दिसत आहे. त्याने अमिताभ बच्चन यांच्यासारखाच सूट घातला आहे. चष्मा, दाढी, केसांची स्टाईल आदी सर्व काही त्याने, अमिताभ बच्चन यांच्यासारखे केले आहे.

सुनील अमिताभ बच्चन यांच्या खुर्चीवर, तर अमिताभ बच्चन स्पर्धकाच्या खुर्चीवर बसले आहेत. सुनील अमिताभ बच्चन यांची मिमिक्री करीत प्रेक्षकांतील एक व्यक्ती जी अर्ध्यात शो सोडून जात असते, तिला ओरडतो. तसेच, तो अमिताभ बच्चन यांच्या स्टाईलमध्ये डान्सदेखील करीत असल्याचे दिसत आहे.

हे व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. सुनील ग्रोवरने याआधीही अमिताभ बच्चन यांची अनेकदा मिमिक्री केली आहे. त्याला आता थेट बिग बींसमोरच त्यांचीच मिमिक्री करीत असल्याचे पाहून चाहते खूश झाले आहेत. त्यांनी कमेंट्स करीत त्यांचा आनंद व्यक्त केला आहे. एकाने लिहिले, “ज्या दोन व्यक्ती समोरासमोर येण्याची प्रतीक्षा होती, ते आता घडत आहे”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “सुनीलजी तुमच्यासारखे कोणीच नाही”, “मस्त”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत. अनेकांनी हार्ट इमोजी देत प्रेम व्यक्त केले आहे.

दरम्यान, कौन बनेगा करोडपतीमधील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. कौन बनेगा करोडपतीच्या मंचावर आलेल्या इशित भट्ट या लहान मुलाची मोठी चर्चा होताना दिसली. तो ज्या पद्धतीने बिग बींशी बोलत होता, त्यावर देशभरातून लोक व्यक्त होत असल्याचे दिसले.

आता अमिताभ बच्चन कोणत्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.