मुक्ता-सागरच्या लग्नामुळे ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेला एक नवं वळणं आलं आहे. लवकरच मुक्ता-सागरची प्रेमाची गोष्ट सुरू होणार आहे. प्रेक्षकांना मालिकेतील सध्याचा लग्नाचा ट्रॅक चांगलाच पसंतीस पडला आहे. त्यामुळे ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेचा ऑनलाइन टीआरपी वाढला आहे. मागील आठवड्याच्या ऑनलाइन टीआरपीच्या यादीत तेजश्री प्रधान आणि राज हंचनाळेची प्रमुख भूमिका असलेली मालिका पहिल्या नंबरवर आली आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून पहिल्या नंबरवर असलेल्या ‘ठरलं तर मग’ मालिकेला ऑनलाइन टीआरपीच्या यादीत ‘प्रेमाची गोष्ट’ने मागे टाकलं आहे. अशातच आता लवकरच गोखलेंची लाडकी लेक कोळी कुटुंबात गृहप्रवेश करताना पाहायला मिळणार आहे.

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या कालच्या भागात भर मंडपात मुक्ताने लग्नाला दिलेल्या नकारामुळे कोळी कुटुंबासह सर्वांनाच धक्का बसला. दुसरीकडे मुक्ताचे आई-बाबा तिची माफी मागताना दिसले. पण अशा परिस्थिती ‘ठरलं तर मग’ मधील सायली मध्यस्थी पडली. तिने मुक्ताला पुन्हा लग्नाला तयार होण्यासाठी समजावलं. तेव्हाच मुक्ताने लग्न मोडण्याचं नाटक केल्याचं समोर आलं. सावनीचा लग्न मोडण्याचा हेतू साध्य करण्यासाठी मुक्ताने भर मंडपात सागरबरोबर लग्न करण्यास नकार दिला आणि त्यानंतर ती तिथून निघून गेली. पण हे सावनीला लग्न खरंच मोडलंय असं वाटावं म्हणून मुक्ताने हे सगळं नाटक केलं होतं. सायलीशी बोलणं झाल्यानंतर मुक्ता लग्न मंडपात पुन्हा आली आणि तिने सागरबरोबर लग्न करण्यास होकार दिला. शिवाय तिने लग्न मोडण्याच्या नाटकामुळे कोळी कुटुंबासह सगळ्यांना मनस्ताप झाल्यामुळे माफी मागितली. त्यानंतर मुक्ता-सागरच्या लग्नविधीला सुरुवात झाली.

हेही वाचा – “बायको असशील घरी…,” नवविवाहित गौतमी देशपांडेला पती असं का म्हणाला? पोस्ट चर्चेत

आता लवकरच गोखलेंची लाडकी लेक मुक्ता कोळी कुटुंबात गृहप्रवेश करताना दिसणार आहे. मुक्ता-सागरचा लग्नसोहळा सुरळीत पार पडला असून मुक्ताची पाठवणी करताना तिच्या आई-बाबांसह सगळेजण भावुक झाल्याचं पाहायला मिळणार आहे. तसेच गृहप्रवेशाच्या वेळी मुक्ताचा खास उखाणा देखील देताना दिसणार आहे. “प्रेमळ माहेर, हौशी सासर, छोटूशा सईचं प्रेम आमाप, सागरचं नाव घेते आणि ओलांडते कोळींच्या घरचं सुखाचं माप…”, असा उखाणा मुक्ता घेणार आहे. ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या पुढील भागात नक्की काय घडणार? याचा व्हिडीओ ‘सीरियल जत्रा’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मुक्ता-सागरच्या लग्नानंतर दोघांसाठी कोळी कुटुंब खास हनिमूनचा प्लॅन करताना दिसणार आहेत. त्यामुळे आता मुक्ता-सागर हनिमूनला नक्की कुठे जाणार? दोघांमध्ये प्रेमाचं नातं कसं निर्माण होणार? हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे.