Tharala Tar Mag : ‘ठरलं तर मग’ मालिकेत अर्जुन पुरावा शोधण्यासाठी साक्षी शिखरेच्या घरी वेश बदलून गेल्याचं पाहायला मिळालं. साक्षी विरोधात ठोस पुरावे मिळवण्यासाठी अर्जुनला हा सगळा प्लॅन करावा लागतो. पण, प्रत्यक्ष शिखरेंच्या घरी गेल्यावर अर्जुनला तिथे प्रिया देखील उपस्थित असल्याचं पाहायला मिळतं.
प्रियाने अशाप्रकारे साक्षी शिखरेच्या घरी उपस्थित राहणं म्हणजेच तिचा जबाब मॅनेज केलाय हे सहज सिद्ध करता येईल, याची अर्जुनला पुरेपूर खात्री असते. आता वेळ आल्यावर तो भर कोर्टात प्रियाला खोटं सिद्ध करणार आहे. वात्सल्य आश्रमाचा निकाल लागण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. या उरलेल्या दिवसांत साक्षी विरोधात जास्तीत जास्त पुरावे कसे गोळा करतील या विचारात अर्जुन असतो.
आता लवकरच मालिकेत कोर्टरुम ड्रामा सुरू होईल. यावेळी अर्जुन त्याच्याजवळ असणारा सर्वात महत्त्वाचा पुरावा कोर्टात सादर करणार आहे. हा पुरावा पाहताच साक्षीसह महिपतची बोलती देखील बंद होणार आहे.
अर्जुन मध्यंतरी तपास करण्यासाठी आश्रमात गेलेला असतो. यावेळी त्याला सोन्याच्या पेडंटचा तुकडा सापडतो. याचं अर्ध पेडंट नक्कीच साक्षीच्या गळ्यात असणार असा विश्वास अर्जुनला असतो. चैतन्य यापूर्वी काही महिने साक्षीबरोबर राहिलेला असल्याने त्याला देखील साक्षीच्या अनेक सवयी माहिती असतात. त्यामुळे पेडंटचा तुकडा दुसरा कोणाचा नसून तो साक्षी शिखरेचाच आहे याची खात्री अर्जुनला होते.
अर्जुनने अखेर ‘तो’ पुरावा दाखवला
सर्वप्रथम अर्जुन कोर्टात साक्षीचे कॉल डिटेल्स दाखवतो. यामध्ये तिचं लोकेशन वात्सल्य आश्रमाजवळच असतं. तसेच साक्षीने कोर्टात तारखाही चुकीच्या सांगितल्या आहेत हे या कॉल डिटेल्सच्या रिपोर्टवरून स्पष्ट होतं. यानंतर अर्जुन त्याच्या जवळचा हुकमी एक्का कोर्टात सादर करणार आहे.
अर्जुन सांगतो, “मला माझ्या हातातील पुरावा दाखवण्याआधी मिस साक्षी यांना एक विनंती करायची आहे. तुमच्या गळ्यात एखादा नेकलेस असेल तर तो प्लीज कोर्टासमोर दाखवा. यावर कोर्टाच्या आदेशानुसार साक्षीला सर्वांसमोर गळ्यातील चैन दाखवावी लागते. यानंतर अर्जुन स्वत:जवळचा पुरावा बाहेर काढतो.”
साक्षीच्या गळ्यातील पेडंटचा अर्धा तुकडा आणि अर्जुनकडे असलेला तुकडा यामुळे पूर्ण ‘एस’ लेटर तयार होतं. यावर अर्जुन आनंदात म्हणतो, ‘परफेक्ट मॅच!’ खरंतर, हा वात्सल्य आश्रम केसचा सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरणार आहे.
अर्जुनकडचा पुरावा पाहिल्यावर साक्षीसह महिपत बोलती भर कोर्टात बंद होते. तर, सायली नवऱ्यावर भरलीच खूश झालेली दिसते. तिचा आनंद गगनात मावेनासा होतो. आता केसचा निकाल लागण्यासाठी शेवटचे काही दिवस बाकी राहिलेले असताना दामिनी काय करणार? अर्जुनला खोट्यात पाडण्यासाठी महिपत आणखी कोणता डाव खेळणार हे मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळेल.
दरम्यान, ‘ठरलं तर मग’ मालिका रोज रात्री ८:३० वाजता ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर प्रसारित केली जाते. सध्या आश्रम केसचा निकाल जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली आहे. जुलै महिन्याच्या अखेरिस याचा सविस्तर निकाल लागेल.