Tharala Tar Mag Jui Gadkari Reaction On Purna Aaji’s Comeback : ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्या निधनानंतर संपूर्ण मराठी मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली होती. प्रेक्षकांच्या लाडक्या पूर्णा आजींनी ६९ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. ज्योती चांदेकर यांच्या निधनानंतर मालिकेत पूर्णा आजीची भूमिका कोण साकारणार याबद्दल गेले काही दिवस सोशल मीडियावर चर्चा सुरू होत्या. अखेर ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी सुभेदारांच्या घरात नव्या पूर्णा आजीच्या रुपात एन्ट्री घेतलेली आहे.

सुभेदारांच्या घरात पूर्णा आजी आल्यावर जुई गडकरी म्हणते, “फायनली! सुभेदारांच्या घरात पुन्हा एकदा पूर्णा आजीचं आगमन झालेलं आहे. तुम्हा सगळ्यांनाच माहितीये…आमची आधीची पूर्णा आजी दुर्दैवाने आम्हाला सर्वांना सोडून गेली. पण, आता रोहिणी ताई सेटवर आलेल्या आहेत. आता इथून पुढे मालिकेत काय घडणार, मालिकेची कथा कोणत्या वळणावर जाणार हे पाहण्यासाठी आम्ही सुद्धा तेवढेच उत्सुक आहोत. कारण, ज्योती ताई अचानक आम्हाला सोडून गेल्या…त्यांच्या निधनानंतर बऱ्याच गोष्टी बदलल्या. आता पूर्णा आजीबरोबर सीन्स करायला आम्ही पुन्हा एकदा तयार आहोत.

जुई पुढे म्हणाली, “आज जेव्हा रोहिणी ताई सेटवर आल्या तेव्हा एक गोष्टी खूप जाणवली…मी ज्योती ताईशी खूप कनेक्ट होते…सतत तिच्याजवळ असायचे. आज रोहिणी ताईंना पाहिल्यावर त्यांना पुढे जाऊन पटकन मिठी मारावी असं मला वाटलं होतं. कारण, त्या पूर्णा आजीच्या लूकमध्ये आमच्यासमोर आल्या होत्या. पण, मी पुढे गेले नाही…काहीच बोलले नाही. कारण, तो क्षण माझ्यासाठी खूपच भावनिक होता. मला ज्योती ताईंची अचानक खूप आठवण आली…तिला मी कायम मिस करत राहीन. त्यानंतर काही वेळाने मी रोहिणी ताईंना भेटायला गेले. आता त्यांच्या एन्ट्रीनंतर मालिकेचं कथानक कसं पुढे जाणार हे जाणून घेण्यासाठी मी सुद्धा तेवढीच उत्सुक आहे.”

“बऱ्याच दिवसांपासून तुम्हाला सर्वांनाही मालिकेत पूर्णा आजीला पाहायचं होतं. तर, ती यानिमित्ताने पूर्ण झाली असेल. हे विशेष भाग प्रेक्षकांना २३ ते २५ ऑक्टोबरदरम्यान पाहता येणार आहेत. त्यामुळे बघत राहा ठरलं तर मग!” अशा भावना जुईने व्यक्त केल्या आहेत.