Tharala Tar Mag Replacement Purna Aaji : ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्या निधनानंतर ‘ठरलं तर मग’ मालिकेत पूर्णा आजीची भूमिका कोण साकारणार? प्रोडक्शन व स्टार प्रवाह वाहिनी पूर्णा आजीच्या रिप्लेसमेंटबाबत काय भूमिका घेणार याबद्दल गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा सुरू होती. अखेर मालिकेत पूर्णा आजीच्या भूमिकेसाठी नव्या ज्येष्ठ अभिनेत्रीची एन्ट्री झालेली आहे.

सुभेदारांच्या अन्नपूर्णा निवासमध्ये पुन्हा एकदा पूर्णा आजी आनंद घेऊन येणार आहेत. मालिकेच्या सेटवर नुकतंच नव्या पूर्णा आजीचं आगमन झालेलं आहे. याची खास झलक ‘स्टार प्रवाह’ने सोशल मीडियावर शेअर केली आहे.

ज्योती चांदेकर यांच्या निधनानंतर मालिकेत पूर्णा आजीची भूमिका रिप्लेस करू नका असं अनेक चाहत्यांचं म्हणणं होतं. मात्र, याबाबत प्रोडक्शन आणि वाहिनीचे हेड कथानकाच्या आवश्यकतेनुसार निर्णय घेतील असं सुचित्रा बांदेकर तसेच मुख्य अभिनेत्री जुई गडकरी यांनी सांगितलं होतं.

यानुसार आता ‘ठरलं तर मग’ मालिकेत आता पूर्णा आजीच्या भूमिकेत नव्या ज्येष्ठ अभिनेत्री सेटवर आल्या आहेत. वाहिनीने अद्याप त्यांचं नाव रिव्हिल केलेलं नाही. मात्र, नेटकऱ्यांनी या अभिनेत्री दुसऱ्या तिसऱ्या कोणीही नसून रोहिणी हट्टंगडी असल्याचं ओळखलं आहे. तशा कमेंट्स सुद्धा या व्हिडीओवर आल्या आहेत.

ttm
ठरलं तर मग मालिकेच्या पोस्टवर कमेंट्स

रोहिणी हट्टंगडींची सेटवर एन्ट्री झाल्यावर मालिकेतील सगळेच कलाकार खूप भावुक झाले होते. प्राजक्ता कुलकर्णी यांनी रोहिणी हट्टंगडी यांना पाहताच क्षणी मिठी मारली. तर, अर्जुनची भूमिका साकारणारा अमित भानुशाली त्यांच्या पाया पडला. आता ‘स्टार प्रवाह’ वाहिनी अधिकृतरित्या त्यांचं नाव केव्हा रिव्हिल करणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, या मालिकेत सध्या प्रियाच्या खऱ्या आई-बाबांची सुभेदारांच्या घरात एन्ट्री झाल्याचा सीक्वेन्स चालू आहे. मात्र, सगळेजण मिस्टर अँड मिसेस लोखंडे यांना सायलीचे आई-बाबा समजत आहेत. आता पूर्णा आजीच्या पुनरागमनामुळे मालिकेचं कथानक कोणतं वळण घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.