Tharala Tar Mag New Purna Aaji : ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या टीमने त्यांच्या चाहत्यांबरोबर एक महत्त्वाची बातमी शेअर केली आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर सुभेदारांच्या घरात पुन्हा एकदा पूर्णा आजीचं आगमन झालेलं आहे. ज्योती चांदेकर यांच्या निधनानंतर पूर्णा आजीची भूमिका कोण साकारणार याबाबत सर्वत्र बरीच चर्चा सुरू होती. अखेर अर्जुनच्या पूर्णा आजीची भूमिका इथून पुढे मालिकेत ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी साकारणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
‘ठरलं तर मग’ मालिकेचा नवीन प्रोमो नुकताच प्रेक्षकांसमोर आला आहे. यामध्ये रोहिणी हट्टंगडी यांनी सुभेदारांच्या घरात पूर्णा आजीच्या रुपात एन्ट्री घेतल्याचं पाहायला मिळत आहे. याबद्दल त्यांनी काय भावना व्यक्त केल्या आहेत जाणून घेऊयात…
“नमस्कार! मी रोहिणी हट्टंगडी. ‘ठरलं तर मग’ मालिकेत पूर्णा आजीची भूमिका ज्योती चांदेकर साकारत होत्या. दुर्दैवाने त्या आज आपल्यात नाहीयेत. त्यामुळे त्यांच्याऐवजी ही भूमिका मी करेन का अशी मला विचारणा झाली होती. त्यावेळी मनात संमिश्र भावना होत्या. खरंतर, ज्योती ही माझी मैत्रीण…१९६५ पासून आमची ओळख होती. तिचं काम मी पाहिलेलं आहे. ही मालिका सुद्धा मी सुरुवातीपासून पाहतेय. मला ही मालिका खूप आवडते. कधीच वाटलं नव्हतं…पुढे जाऊन असं काहीतरी घडेल. खरं सांगायचं झालं तर, मी यापूर्वी कधीच रिप्लेसमेंट भूमिका केली नव्हती. कारण, एका कलाकाराने आधीच संबंधित भूमिकेला एका पातळीवर नेऊन ठेवलेलं असतं. तिथून तुम्हाला परत सुरुवात करायची असते. आधीच्या कलाकाराने जितकं सुंदर काम केलंय तेवढंच नव्याने येणाऱ्या कलाकाराही करावं लागतं. त्यामुळे निश्चितच काही दिवस अवघड जातील. पण, माझी ही भूमिका नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीला उतरेल अशी खात्री वाटते. कारण, मी माझ्याबाजूने खूप प्रयत्न करणार आहे. फक्त प्रेक्षकांनी तितक्याच दिलदारपणे मला स्वीकारावं अशी माझी इच्छा आहे.” असं रोहिणी हट्टंगडी सगळ्या प्रेक्षकांना उद्देशून म्हणाल्या आहेत.
दरम्यान, पूर्णा आजीच्या एन्ट्रीचा सीन प्रेक्षकांना दिवाळीच्या मुहूर्तावर पाहायला मिळणार आहे. यावेळी सायलीच्या आई-बाबांना घराबाहेर हाकलणाऱ्या प्रियाला पूर्णा आजी चांगलाच धडा शिकवणार आहेत. आजी पुन्हा एकदा सर्वांसमोर प्रियाला कानशिलात लगावणार आहे.