Tharla Tar Mag Fame Jui Gadkari : ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या अर्जुनने खोटारड्या प्रियाची पूर्णपणे कोंडी केल्याचं पाहायला मिळत आहे. प्रिया आश्रम केसच्या चौकशीसाठी मानसिकता ठिक नसल्याचं कारण सांगून नकार देते. मात्र, आता अर्जुन मानसोपचार तज्ज्ञांसमोर तिची चौकशी करणार आहे. या चौकशीदरम्यान, अर्जुनला आश्रम केससंदर्भात मोठा पुरावा सापडणार आहे. कारण, प्रियाने यापूर्वी दिलेली साक्ष आणि आताची माहिती यात अर्जुनला तफावत जाणवते.
‘ठरलं तर मग’ मालिकेत हळुहळू आश्रम केसचा एक-एक पुरावा अर्जुनसमोर येत आहे. त्यामुळे ही मालिका संपणार का? अशी भीती एका चाहत्याने मालिकेची मुख्य नायिका जुई गडकरीसमोर व्यक्त केली.
मालिकेत सायलीची मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री जुई गडकरी इन्स्टाग्रामवर कायम सक्रिय असते. नुकतंच तिने ‘आस्क मी सेशन’ घेत चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी जुईने अनेक खुलासे करत आपल्या चाहत्यांच्या शंकांचं निरसण देखील केलं आहे.
जुई गडकरीला एका नेटकऱ्याने “आता हळुहळू सत्य समोर येत आहे, तर मालिका संपणार नाही ना? आम्हाला ही मालिका खूप आवडते…” असा प्रश्न विचारला. यावर अभिनेत्रीने सविस्तर उत्तर दिलं आहे.
“थँक्यू! नाही! एवढ्यात ही मालिका नक्कीच नाही संपणार… अजून खूप गोष्टी बाकी आहेत. सध्या मालिका पाहून काही लोक म्हणतात, ‘काय चाललंय’ ( रागावतात ) तर, काही लोक सांगतात, ‘असंच चालू राहूद्या आम्हाला ‘ठरलं तर मग’ मालिका पाहून छान वाटतं.’ मी सगळ्यांना एवढंच सांगेन की, गुन्हा मोठा तेवढीच शिक्षा मोठी! लवकरच तुमच्या मनासारखं पाहायला मिळणार आहे. त्याची सुरुवात आता झालीय…त्यामुळे ‘ठरलं तर मग’ मालिका असेच पाहत राहा.” असं आवाहन जुईने मालिकेच्या चाहत्यांना केलं आहे.

दरम्यान, ‘ठरलं तर मग’ मालिकेबद्दल सांगायचं झालं, तर गेली अडीच वर्षे ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. सलग दोन वर्षे ही मालिका ‘स्टार प्रवाह’ पुरस्कार सोहळ्यात ‘महाराष्ट्राची महामालिका’ ठरली आहे.