Swapnil Rajshekhar Lovestory : स्वप्नील राजशेखर मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. सध्या ते ‘कलर्स मराठी’वरील ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत झळकत आहेत. स्वप्नील राजशेखर सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात आणि अनेकदा विविध मुद्द्यांवर त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त करत असतात. अशातच आता त्यांनी त्यांची प्रेमकहाणी सांगितली आहे.

स्वप्नील राजशेखर अनेकदा त्यांच्या कुटुंबीयांबद्दल सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. अशातच त्यांनी नुकतीच सहपत्नीक ‘दूरदर्शन सह्याद्री’ला मुलाखत दिली आहे. यामध्ये त्यांनी त्यांच्या प्रेमकहाणीबद्दल सांगितलं आहे. त्यांच्या पत्नी त्यांच्यापेक्षा वयाने मोठ्या असून या दोघांनी पळून जाऊन लग्न केलेलं, याबद्दल सांगितलं आहे.

स्वप्नील यांच्या पत्नी तेजस्विनी भूतकर यांचे वडील पोलिस खात्यात होते आणि त्यांचा या लग्नाला विरोध होता; कारण त्यावेळी स्वप्नील यांचं करिअर घडलेलं नव्हतं. ते पुढे काय करणार आहेत याबद्दल काही ठरलेलं नव्हतं. पण, तरीही तेजस्विनी व स्वप्नील यांनी पळून जाऊन लग्न केलं. तेजस्विनी यांच्या घरच्यांचा जरी याला विरोध असला तरी स्वप्नील यांच्या घरच्यांनी मात्र त्या दोघांना पाठिंबा दिला आणि पळून जाण्यात मदत केली. याबद्दल त्यांनीच या मुलाखतीत सांगितलं आहे.

म्हणून कुटुंबीयांचा होता विरोध

मुलाखतीत तेजस्विनी म्हणाल्या, “आम्हाला पटकन होकार मिळाला नाही. सगळ्यांचा विरोध होता. खूप दिवस आम्ही त्यांना सांगितलंच नाही. पण, माझ्या सासुबाई, माझी बहीण यांच्याकडून पुढाकार घेण्यात आलेला.” स्वप्नील याबद्दल पुढे म्हणाले, “त्यांच्या घरातून विरोध अशासाठी होता की मी तिच्यापेक्षा वयाने थोडा लहान आहे, त्यावेळी मी काही उद्योग धंदा करत नव्हतो. मी क्रिकेट खेळायचो, मित्रांबरोबर फिरायचो; पुढे काय करायचं हे निश्चित झालं नव्हतं, त्यामुळे त्यांचा विरोध होता.”

स्वप्नील व तेजस्विनी यांनी पुढे त्यांनी पळून जाऊन लग्न केलं याबद्दल सांगितलं आहे. तेजस्विनी म्हणाल्या, “हा दोन दिवस आधी म्हणाला की जर तुला वाटत असेल तर आपण थांबूयात. जर तुला त्रास होत असेल तर. शेवटच्या दिवशी लग्नाच्या दिवशी त्याला वाटत नव्हतं की मी येइन”. स्वप्नील यांनी पुढे सांगितलं की, त्यांचं संपूर्ण कुटुंब आणि तेजस्विनीसह पळून जाऊन त्यांनी लग्न केलं. त्यावेळी तेजस्विनी यांच्या कुटुंबातून कोणीही आलं नव्हतं.