‘झी मराठी’ वाहिनीवर ‘यशोदा- गोष्ट श्यामच्या आईची’ ही मालिका फेब्रुवारी महिन्यात सुरू झाली होती. परंतु, टीआरपी नसल्याने सहा महिन्यांतच ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता नुकताच साने गुरुजींवर आधारित ‘श्यामची आई’ हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यामुळे ‘यशोदा’ मालिकेचे दिग्दर्शक विरेंद्र प्रधान यांनी “आमची मालिका बंद झाली पण, हा नव्याने प्रदर्शित झालेला चित्रपट नक्की पाहा” असं आवाहन पोस्ट शेअर करत प्रेक्षकांना केलं आहे.

हेही वाचा : “Proud of you बायको!”, सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकरने घेतली पहिली आलिशान गाडी, किंमत माहितीये का?

विरेंद्र प्रधान यांची पोस्ट

श्यामची आई हा चित्रपट नुकताच रिलीज झालाय. माझ्या मते काही पुण्यकर्मे जर आपल्याला करायची असतील, त्यांनी आवर्जून हा चित्रपट पहावा. आपल्या आजी-आजोबांना, आई-वडिलांना, मुलांना, विद्यार्थ्यांना दाखवावा. मी ‘यशोदा- गोष्ट श्यामच्या आईची’ ही मालिका करायचा प्रयत्न केला परंतु, पुरेसा प्रेक्षक वर्ग न मिळाल्यामुळे, मालिका अर्ध्यावर बंद करावी लागली. परंतु, या चित्रपटाबद्दल असे होऊ नये. टीआरपी नाही म्हणून मालिका बंद करायची ताकद जशी वाहिन्यांना असते तशी असे चित्रपट, नाटक, मालिका पुढील पिढ्यांपर्यंत राखून ठेवायची ताकद प्रेक्षकांमध्ये यायला हवी. चांगलं बघायला मिळत नाही अशी नेहमी ओरड ऐकू येते. मग जे चांगलं आहे ते टिकवायचे पुण्यकर्म आपल्या हातून व्हावे. दीपावली आहे. आनंद घ्या, आनंद वाटा. आपल्या मुलांसाठी हे आवश्यक आहे. त्यांनी उत्तम माणूस होण्यासाठी, या देशाचा उत्तम नागरिक होण्यासाठी, हा संस्कारांचा अग्निहोत्र पाहिला पाहिजे. मनात रुजवला पाहिजे. जात-धर्म या पलिकडे जाऊन ही आई आणि मुलाची सुंदर गोष्ट पाहिली पाहिजे. साने गुरुजी, साधना प्रकाशन, सुधाताई साने यांच्या पुण्यकर्माने, आशिर्वादाने हा चित्रपट घराघरांत पोहोचावा. चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि टीम यांना उदंड यश लाभो. शुभ दीपावली – विरेन

विरेंद्र प्रधान यांना ऐतिहासिक मालिकांच्या दिग्दर्शनासाठी ओळखलं जातं. त्यांनी आतापर्यंत ‘उंच माझा झोका’, ‘स्वामिनी’, ‘संत ज्ञानेश्वर’, ‘राधा प्रेम रंगी रंगली’, ‘यशोदा-गोष्ट श्यामच्या आईची’, ‘भाग्यविधाता’ अशा अनेक गाजलेल्या मालिकांचं दिग्दर्शन केलं आहे.

हेही वाचा : ‘झिम्मा २’ चित्रपटातील सिद्धार्थ चांदेकरची आवडती अभिनेत्री कोण? सात जणींमध्ये अभिनेत्याने केली ‘या’ दोघींची निवड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
virendra
विरेंद्र प्रधान

दरम्यान, विरेंद्र यांनी शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देत आपली मतं मांडली आहेत. एक युजर लिहितो, “याला म्हणतात मनाचा मोठेपणा…किती तळमळ…किती कळकळीने ही भावनिक साद घातली आहे.”, तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने या पोस्टवर “शाब्बास विरेंद्र जी….एका दिग्दर्शकाने, निर्मात्याने….स्वतःचे दुःख विसर्जित करून, दुसर्‍या दिग्दर्शकाला, निर्मितीला मनापासून दाद देत आहात…” अशी कमेंट करत विरेंद्र प्रधान यांचं कौतुक केलं आहे.