Kamali upcoming twist: नव्या मालिकाद्वारे एक नवीन गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळते. भयकथा, विनोदी, रोमँटिक, प्रेरणादायी, ऐतिहासिक अशा विविध जॉनरमधील मालिका प्रेक्षक पाहत असतात. अशातच काही दिवसांपूर्वीच ‘कमळी’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
आई आणि आबांबरोबर गावात राहणारी कमळी शहरात जाऊन शिक्षण घेण्याची मोठी स्वप्न बघते. आईचा विरोध असतानादेखील तिला शहरात जाऊन शिक्षण घ्यायचे आहे. मुंबईसारख्या शहरात आपल्या मुलीने जाऊ नये, असे तिच्या आईला वाटते. कारण- त्या शहरातील तिच्या वाईट आठवणी आहेत. मुंबईच्या कॉलेजमध्ये तिला अॅडमिशन मिळाल्याचे समजताच तिची आई तिचे लग्न लावून देण्यासाठी तिच्यावर दबाव टाकणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
झी मराठी वाहिनीने कमळी मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की कमळी तिच्या आबांसमोर तिचा आनंद व्यक्त करत आहे. मुंबईला शिक्षणासाठी जात असल्याचा आनंद, उत्साह तिच्यामध्ये दिसत आहे. तिचे आजोबादेखील तिच्या आनंदात सहभागी होताना दिसत आहेत. पण, कमळीच्या घरी तिच्या लग्नासाठी स्थळ आल्याचे दिसते. मुलाकडची मंडळी त्यांना मुलगी पसंत असल्याचे सांगतात.
“मला मुंबईला जाऊन…”
मुलाचे वडील सांगतात की आमचा मुलगा दुबईला कामाला असतो. लग्नानंतर तो मुलीला बरोबर घेऊन जाईल. ते ऐकल्यानंतर कमळीच्या आईच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो. मात्र, कमळी या सगळ्याला विरोध करते. ती तिच्या आईला म्हणते, “तुला चांगलच माहित आहे, मला मुंबईला जाऊन शिक्षण घ्यायचं आहे. मला लग्न करायचं नाही.” असे म्हणून ती रागाने आईच्या हातातील साडी व अलंकार असलेल्या ताटाला धक्का देते. ते पाहून तिची आई तिच्यावर हात उगारते.
दुसरीकडे, कमळीच्या आजोबांची जमीन विकत घेण्यासाठी अनिकाच्या आई आणि आजी कारस्थान करताना दिसत आहे. ज्या व्यक्तीला कमळीच्या आजोबांची जमीन मिळवण्याचे काम सोपवले होते, तो म्हणतो, “असं समजा की कमळीचं लग्न आणि ती दुबईला गेली.” ही गोष्ट ऋषी ऐकतो.
प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, कमळी तिच्या आजोबांपुढे तिच्या साडीच्या पदराला एक गाठ बांधते आणि म्हणते, “ही मी नवसाची गाठ बांधली. आता मी तेव्हाच घरी येईन, जेव्हा माझी आई माझं ऐकण्यासाठी तयार होईल”, कमळीचे बोलणे ऐकूण तिच्या आजोबांच्या चेहऱ्यावर चिंता दिसत आहे.
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “मुंबईची वाट की लग्नाची गाठ..काय लिहिलंय कमळीच्या नशिबात?”, अशी कॅप्शन दिली आहे.
आता कमळी तिचे स्वप्न कसे पूर्ण करणार, तिची आई माघार घेणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.