तमिळ सुपरस्टार थलपथी विजय त्याच्या आगामी ‘लिओ’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर लोकप्रिय अभिनेत्री त्रिशा कृष्णन दिसणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरची चाहते अत्यंत आतुरतेने वाट बघत होते. अखेर काल म्हणजेच गुरुवारी संध्याकाळी ६.३० च्या सुमारास निर्मात्यांनी या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित केला.
हा चित्रपट तामिळ, तेलगू, कन्नड आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. सिनेरसिक आणि विजयचे चाहते या ट्रेलरची आतुरतेने वाट बघत होते, पण चेन्नईमध्ये मात्र काही वेगळंच चित्र पाहायला मिळालं आहे. चेन्नईच्या रोहिणी सिल्व्हरस्क्रीन्स चित्रपटगृहात ‘लिओ’च्या ट्रेलरचं खास स्क्रीनिंग आयोजित करण्यात आलं होतं. तमाम चित्रपटप्रेमी व विजयचे चाहते यांनी यासाठी तोबा गर्दी केली होती, पण ही स्क्रीनिंग आयोजित करणं चित्रपटगृहाच्या मालकांना चांगलंच महागात पडलं आहे.
ट्रेलरमध्ये विजयला पडद्यावर पाहताच त्याचे चाहते एवढे उत्सुक झाले की या नादात त्यांच्या हातून तिथल्या खुर्च्यांची मोडतोड झाली. या स्क्रीनिंगसाठी हजारो चाहत्यांनी गर्दी केली होती, पण पडद्यावर आपल्या लाडक्या सुपरस्टारला पाहून चाहते भान हरपून चेकाळले अन् त्या उत्साहात त्यांनी खुर्च्या तोडल्या. त्या खुर्च्या आता दुरुस्तदेखील होणार नाहीत इतकी वाईट अवस्था रोहिणी सिल्व्हरस्क्रीन्समध्ये पाहायला मिळाली.
आधी या चित्रपटाच्या ट्रेलरचं स्क्रीनिंग कार पार्किंगमध्ये करण्याचा व्यवस्थापकांचा विचार होता. परंतु पोलिसांकडून यासाठी परवानगी न मिळाल्याने त्यांना नाईलाजाने हा कार्यक्रम चित्रपटगृहाच्या परिसरात आयोजित करावा लागला. तामिळनाडूमधील बऱ्याच चित्रपटगृहात ‘लिओ’च्या ट्रेलरचं स्क्रीनिंग आयोजिय करण्यात आलं होतं.
एलसीयू म्हणजेच लोकेश सिनेमॅटीक युनिव्हर्सप्रमाणे हा चित्रपटही दाक्षिणात्य राज्यात धुमाकूळ घालणार हे नक्की. शिवाय हिंदीतसुद्धा हा चित्रपट सगळे रेकॉर्ड मोडीत काढणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या चित्रपट बॉलिवूड अभिनेता संजय दत्तचीसुद्धा महत्त्वाची भूमिका आहे. ‘लिओ’ १९ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.