‘मनी हाइस्ट’ ही स्पॅनिश वेब सीरिज सध्या बरीच चर्चेत आहे. या वेब सीरिजने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. या सीरिजने अनोख्या कथेच्या जोरावर संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. यातील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळताना दिसतं आहे. या लक्षवेधी चोरांनी तब्बल चार सिझनमधून प्रेक्षकांना खिळवून ठेवले होते. येत्या सप्टेंबर महिन्यात या सीरिजचा पाचवा आणि शेवटचा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यातील टोकियोची भूमिका साकारणारी उर्सुला कॉर्बेरो लवकरच बॉलिवूडमध्ये झळकणार अशी चर्चा रंगू लागली आहे. यावर आता उर्सुला हिने एका मुलाखतीत या बाबत खुलासा केला आहे.
‘मनी हाइस्ट’मध्ये टोकियोचा बिनधास्त, बेधडक, स्वतःचे मतं खरं करणारी दाखवली आहे. त्याच प्रमाणे खऱ्या आयुष्यात देखील उर्सुला स्वतःला ठराविक गोष्टीसाठी मर्यादीत ठेवातं नाही. तिला आव्हानांना समोर जायला आवडतं. ‘मनी हाइस्ट’ बद्दल आणि एकंदरीत भारताबद्दल तिला असलेल्या आपुलकी बद्दल टोकियो म्हणजेच उर्सुलाने ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, “मी भारतात कधी आले नाही. मी भारत पाहण्यासाठी उत्सुक आहे. मला चित्रपटांची नावं लक्षात राहत नाही. मात्र मी भारतीय चित्रपट पाहिले आहेत. पण मला एका चित्रपटाचे नावं लक्षात आहे ते म्हणजे ‘स्लम डॉग मिलेनियर’. हा चित्रपट मी पाहिला आहे आणि मला तो प्रचंड आवडला.” उर्सुलाला जेव्हा बॉलिवूडमध्ये काम करणार का? असा प्रश्न विचारला तेव्हा ती म्हणाली की, “हा, जर माझ्याकडे वेळ असेल तर मी नक्की काम करेन. मला हिंदी शिकवणारं कोणी असेल तर मला हिंदी चित्रपटात सुद्धा काम करायला आवडेल. ”
उर्सुलाला नवीन गोष्टी शिकायला आवडतात. ती त्या गोष्टींकडे आव्हान म्हणून बघते. याबद्दल उदाहरण देत तिने सांगितले की, “एका इंग्रजी चित्रपटासाठी काम करायचे होते तेव्हा सुरवातीला माझं इंग्रजी काही खास नव्हते. मात्र नंतर मी हे आव्हान म्हणून स्विकारलं आणि त्यावर काम केलं.” उर्सुला म्हणजेच ‘मनी हाइस्ट’मधील टोकियोचं हे मतं ऐकून तिच्या फॅन्सना आता उर्सुला कॉर्बेरो बॉलिवूडमध्ये झळकणार का? असा प्रश्न पडला आहे. दरम्यान बहुचर्चित वेब सीरिज ‘मनी हाइस्ट’चा पाचवा आणि शेवटचा सिझन दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे. पहिला भाग ३ सप्टेंबर २०२१ तर दुसरा भाग ३ डिसेंबर २०२१ रोजी प्रदर्शित होणार आहे.