अतरंगी फॅशनसाठी ओळखली जाणारी मॉडेल आणि अभिनेत्री उर्फी जावेद ही सध्या भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्यामुळे चर्चेत आहे. उर्फीच्या कपड्यांवर चित्रा वाघ यांनी आक्षेप घेतला आणि या वादाला सुरुवात झाली. चित्रा वाघ यांनी सुरुवातीला त्यांनी ट्वीट करत उर्फीचा समाचार घेतला नंतर या प्रकरणी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेत त्यांना पत्र दिलं. त्यात त्यांनी ‘उर्फी जावेदरुपी स्त्री देहाचा बाजार रोखा’, अशी मागणी केली होती. यानंतर आता चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यात सोशल मीडिया वॉर पाहायला मिळत आहे.

चित्रा वाघ यांनी काही तासांपूर्वी अनेक ट्वीट केले होते. यात त्यांनी “आपल्या कामाची गरज म्हणून कोणाचा पेहराव तसा असेल, तर तो झाला कामाचा भाग यावर माझा किंवा कोणाचाही आक्षेप असायचं कारण नाही. पण जिथे आपण समाजात वावरतो सार्वजनिक ठिकाणी भर वस्ती आणि रस्त्यावर खुल्या वातावरणात आपला पेहराव व्यवस्थित राखणं हे सामाजिक भान आहे. तो जर राखला जात नसेल तर त्याला नंगट मानसिकता का म्हणू नये? व्यक्तीस्वातंत्र्याचा सन्मान नं राखता, त्याचा अतिरेक करणाऱ्यांना रोखणं, हा ही धर्म नाही का?, लेकी-बाळी तर आपल्या प्रत्येकाच्याच घरी आहे, त्यांच्यासमोर असे आदर्श असावेत का?,” असा सवाल चित्रा वाघ यांनी विचारला आहे.

आणखी वाचा : Open Letter: चित्राताई वाघ, उर्फीवर कारवाई करण्यास एवढा उशिराचा मुहूर्त का?

त्यावर आता उर्फी जावेदने उत्तर दिले आहे. उर्फी जावेदने नुकतंच ट्वीटरवर एक ट्वीट केले आहे. यात तिने चित्रा वाघ यांच्याबद्दल अनेक प्रश्न विचारले आहेत. मी भाजपामध्ये प्रवेश केल्यावर चित्रा वाघ आपण एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी नक्कीच बनू. चित्रा जी, तुम्हाला संजय राठोड आठवतात का? तुम्ही भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांच्याशी घनिष्ठ मैत्री झाली आणि तुम्ही त्यांच्या सर्व चुका विसरलात. पण राष्ट्रवादीत असताना मात्र त्यांच्यावर अनेक आरोप केले होते.

विश्लेषण : उर्फी जावेद विरुद्ध चित्रा वाघ; नेमका वाद काय? चित्रविचित्र कपड्यांमुळे उर्फी वादात का अडकते? वाचा नेमकं काय घडलं!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पुजा चव्हाण प्रकरणावरूनही चित्रा वाघ यांच्यावर टीकास्र सोडले होते. “महिलांचा राजकीय फायद्यासाठी वापर करणाऱ्या लोकांकडून जास्त अपेक्षा करू नये. खरं तर महाविकास आघाडीने ज्या मंत्र्याचा राजीनामा घेतला. त्यांनाच आज भाजपाने मंत्रीमंडळात सामावून घेतलं आहे. त्यामुळे आता जर संजय राठोड निर्दोष असतील, तर प्रश्न असा निर्माण होतो, की पुजा चव्हाणला तुम्ही बदनाम केलं का? पीडितेचं नाव घेऊ नये, असा आपल्याकडे अलिखीत नियम आहे, मग केवळ राजकीय शिड्या मजबूत करण्यासाठी तुम्ही एका भटक्या विमुक्त समजातील मुलीच्या अब्रुचं तुम्ही खोबरं उधळलं, त्याचं काय? यावर बोललं जात नाही”, असे त्या म्हणाल्या होत्या. त्यानंतर आता उर्फीनेही या प्रकरणी भाष्य केले आहे. आता यावर चित्रा वाघ काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.