Varun Dhawan Drink Alcohol at Early Morning with Manish Paul : वरुण धवन सध्या त्याच्या आगामी ‘सनी संस्कार की तुलसी कुमारी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहे. अभिनेता चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. प्रमोशनदरम्यान वरुणने त्याच्या ‘जुग जुग जियो’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा एक मजेदार किस्सा सांगितला आहे.

पिंकव्हिलाबरोबरच्या संभाषणादरम्यान जेव्हा वरुणला चित्रपटाच्या सेटवरील त्याच्या सर्वात विचित्र क्षणाबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्याने हा किस्सा सांगितला. त्याने सांगितले की, अनिल कपूरबरोबर क्लायमॅक्स सीन शूट करत असताना, ज्यामध्ये त्याच्या पात्राला दारू पिऊन डायलॉग बोलायचे होते, तेव्हा त्याने सकाळी ७:३० वाजता मनीष पॉलबरोबर दारू प्यायला सुरुवात केली होती.

वरुण म्हणाला, “अनिल सरांबरोबरच्या त्या क्लायमॅक्स सीनदरम्यान मला नशेत येऊन माझे डायलॉग बोलायचे होते, त्यामुळे आम्हाला खरोखरच दारूच्या नशेत असणं आवश्यक होतं. आम्ही सकाळी ७:३० वाजता दारू पिण्यास सुरुवात केली. मनीष आणि मी सकाळीच प्यायला सुरुवात केली आणि दुपारपर्यंत आमची जीभ अडखळायला लागली. नंतर मला शांत व्हावे लागले, परंतु सीन पूर्ण झाले नसल्याने दुसऱ्या दिवशी मला तेच पुन्हा करावे लागले.”

‘सनी संस्कार की तुलसी कुमारी’ हा चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित…

वरुण धवन सध्या त्याच्या आगामी ‘सनी संस्कार की तुलसी कुमारी’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. हा चित्रपट २ ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. वरुणबरोबर जान्हवी कपूर, रोहित सराफ, सान्या मल्होत्रा, मनीष पॉल आणि अक्षय ओबेरॉय मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’ आणि ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ या सिनेमांचे दिग्दर्शक शशांक खेतान यांनीच या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.

‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ आणि ऋषभ शेट्टीचा ‘कांतारा चॅप्टर १’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर टक्कर देणार आहे. ‘कांतारा चॅप्टर १’ हा चित्रपट खूप चर्चेत आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ आणि ‘कांतारा चॅप्टर १’ पैकी कोणता चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी होईल हे पाहणे बाकी आहे.