Sunny Kaushal on Katrina Kaifs Pregnancy : अलीकडेच कतरिना कैफने तिच्या गरोदरपणाची घोषणा केली. अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. या आनंदाच्या बातमीने कतरिनाच्या कुटुंबात आनंद पसरला आहे. विकी कौशलचा भाऊ सनी कौशलने कतरिना कैफच्या गरोदरपणाबद्दल सांगितले आहे.

शनिवारी (४ ऑक्टोबर) रात्री मुंबईत एका कार्यक्रमात सहभागी झालेल्या सनीला कतरिना कैफच्या गरोदरपणाबद्दल विचारण्यात आले. अभिनेत्याने सांगितले की, घरी सर्व जण आनंदी आहेत; पण सर्वांना चिंतादेखील आहे. सनी म्हणाला, “सर्व जण खूप आनंदी आहेत आणि पुढे काय होईल याबद्दल त्यांना चिंता आहे. आम्ही त्या दिवसाची वाट पाहत आहोत.” नेटकऱ्यांनी व्हिडीओवर कमेंट केली आहे. एकाने लिहिले, “स्वागत आहे.” दुसऱ्याने लिहिले, “हँडसम काका.”

कतरिना आणि विकी कौशल यांनी आपल्या सोशल मीडियाद्वारे दोघांचा एक क्युट फोटो शेअर करीत आई-बाबा होणार असल्याची आनंदाची बातमी दिली होती. या जोडप्यानं हसत हसत स्वतःचा एक ब्लॅक अँड व्हाइट फोटो शेअर केला होता.

सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या या पोस्टमध्ये कतरिनाच्या पोटावर विकीने हात ठेवल्याचा एक फोटो पाहायला मिळत आहे आणि हाच फोटो दोघांनी हातात धरला आहे. आई-बाबा होणार असल्याची गुड न्यूज शेअर करीत विकी-कतरिना म्हणतात, “आम्ही आमच्या आयुष्यातील एका सर्वांत सुंदर अध्यायाची सुरुवात करीत आहोत. आमचं मन आनंद आणि कृतज्ञतेनं भरून आलं आहे.”

लग्नानंतर चार वर्षांनी कतरिना आणि विकी दोघे आई-बाबा होणार आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीचा बेबी बंप असलेला एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तेव्हापासून अभिनेत्री आई होणार असल्याची चर्चा सर्वत्र होत होती.

२०२१ मध्ये कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी राजस्थानमध्ये डेस्टिनेशन वेडिंग केले होते. त्यांच्या लग्नाला फक्त कुटुंबीय आणि जवळचे नातेवाईक उपस्थित होते. या जोडप्याने इन्स्टाग्रामवर त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर करीत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता.