Virat Kohli Most Favourite Song : आपले आवडते सेलिब्रिटी आणि क्रिकेटपटू त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात काय-काय करतात हे जाणून घेण्याची प्रत्येकालाच इच्छा असते. अलीकडच्या काळात सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहतात. त्यांचं डाएट, फिटनेस मंत्रा, त्यांचे आवडते सिनेमे, गाणी या सगळ्या गोष्टी ते इन्स्टाग्रामवर शेअर करत असतात. अशाच एका व्हिडीओमध्ये विराट कोहलीने त्याच्या आवडत्या गाण्याबद्दलचा खुलासा सर्वांसमोर केला आहे.

सध्या देशभरात आयपीएलच्या अठराव्या सीझनची जोरदार चर्चा चालू आहे. भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली गेली १८ वर्षे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु ( RCB ) या संघाकडून IPL खेळत आहे. नुकताच आरसीबीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर विराटबद्दलचा खास व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये त्याने त्याच्या आवडत्या गाण्याविषयी खुलासा केला आहे.

विराट पंजाबी आणि हिंदी गाणी मोठ्या प्रमाणात ऐकतो असं त्याच्या जवळच्या मित्रमंडळींनी तसेच भारताच्या अन्य खेळाडूंनी अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं होतं. पण, प्रत्यक्षात इंग्रजी नाही, हिंदीही नाही तर, सध्या विराट एक तामिळ गाणं सर्वात जास्त ऐकतोय. या गाण्याचं नाव आहे ‘नी सिंघम धन’ ( Nee Singam Dhan ).

‘नी सिंघम धन’ हे एक तामिळ गाणं आहे. हे गाणं २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पथू थाला’ चित्रपटाच्या साउंडट्रॅकचा भाग आहे. ए आर रहमान आणि सिड श्रीराम यांनी हे सुंदर गाणं गायलेलं आहे. सध्या विराट ‘नी सिंघम धन’ हे गाणं Loop वर ऐकत असल्याचा खुलासा त्याने स्वत: या व्हिडीओमध्ये केला आहे. या व्हिडीओवर ‘स्टार स्पोर्ट्स तामिळ’कडून “You are a lion” अशी तामिळ भाषेतून कमेंट करण्यात आली आहे.

दरम्यान, विराट कोहलीचं आवडतं गाणं समजल्यावर त्याचे सगळे चाहते आनंदी झाले आहेत. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “आता या गाण्याची लोकप्रियता आणखी वाढणार”, “किंग तामिळ गाणी ऐकतोय वाह”, “हे गाणं विराटला परफेक्ट लागू होतं”, “आता आम्ही पण हे गाणं लूपवर ऐकणार” अशा प्रतिक्रिया युजर्सनी या व्हिडीओवर दिल्या आहेत.