‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट प्रदर्शित होऊन २ महिने उलटून गेले असले तरीही सोशल मीडियावर हा चित्रपट अद्याप चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटावर ‘सिंगापूर फिल्म फेस्टिवल’मध्ये बंदी घालण्यात आली. त्यावेळी काँग्रेस नेता शशी थरूर आणि दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्यात ट्विटर वाद झालेला पाहायला मिळाला होता. आता आरोपी यासीन मलिकनं काश्मिरमध्ये झालेल्या दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याची कबुली दिल्यानंतर विवेक अग्निहोत्री यांनी पुन्हा एकादा शशी थरूर यांच्यासोबतच बॉलिवूड सेलिब्रेटींवर निशाणा साधला आहे. त्याचं हे ट्वीट बरंच चर्चेत आहे.

विवेक अग्निहोत्री यांनी आपल्या ट्वीटमध्ये चित्रपटावर टीका केल्याबाबत शशी थरूर, अरविंद केजरीवाल आणि ट्विंकल खन्ना यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी एएनआय वृत्तसंस्थेनं यासीन मलिकच्या कबुलीबाबतचं ट्वीट रिट्विट करताना लिहिलं, “काश्मिर मधील नरसंहाराला नाकारणाऱ्यांनो तुम्ही अजूनही हा चित्रपट केवळ अर्धसत्य, काल्पनिक किंवा मुस्लिमविरोधी आहे असं म्हणणार आहात का?” आपल्या या ट्वीटमध्ये त्यांनी अरविंद केजरिवाल आणि शशी थरूर यांना टॅग करत, “आत्ताही तुम्ही यावर हसणार आहात का?” असा सवाल केला आहे. यासोबत त्यांनी अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्नाचं नाव न घेता तिचा स्टार वाइफ असा उल्लेख करत, “तुम्ही अजूनही ‘नेल फाइल्स’ नावाचा चित्रपट तयार करण्याचा विचार करत आहात का?” असा प्रश्न देखील विचारला आहे.

आणखी वाचा- “बाप हा नेहमी बापच असतो…” महेश बाबूला सुनील शेट्टीचं सडेतोड उत्तर

आपल्या आणखी एका ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं, “आज या नरसंहाराची शिकार ठरलेला विशेषतः काश्मिरी हिंदू लोकांसाठी उत्सवाचा दिवस आहे. नरसंहार नाकारणारे, काँग्रेस आणि अर्बन नक्षलवाद्यांसाठी आजचा दिवस हा दुःख व्यक्त करण्याचा आहे. आज सत्य, न्याय आणि मानवतेच्या विजयाचा दिवस आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान ‘द कश्मीर फाइल्स’ हा बॉलिवूडमधील या वर्षांत आतापर्यंत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. १४ कोटींचं बजेट असलेल्या चित्रपटानं २५० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. या चित्रपटात अनुपम खेर, दर्शन कुमार, पल्लवी जोशी, मिथुन चक्रवर्ती या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत.