हिंदी चित्रपटसृष्टीचे पहिले सुपरस्टार म्हणून आजही राजेश खन्ना यांच्याकडे पाहिलं जातं. राजेश खन्ना यांनी त्यांच्या अनोख्या अभिनय शैलीने नेहमीच सर्वांची मनं जिकंली. अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांच्या मनावर कायमचा ठसा उमटवण्यात राजेश खन्ना निर्विवादपणे यशस्वी झाले. त्यामुळेच अद्याप सिनेसृष्टीत त्यांच्यासारखा दुसरा सुपरस्टार कोणीही होऊ शकलं नाही. मात्र एकदा राजेश खन्ना यांना तुमच्यानंतर दुसरा सुपरस्टार कोण होणार? असा प्रश्न विचारला होता. त्यावेळी त्यांनी या प्रश्नाचे संदर्भासह स्पष्टीकरण दिले होते.
राजेश खन्ना यांनी त्यांच्या अभिनय कारकीर्दीत १६० पेक्षा जास्त चित्रपटांत, जवळपास १७ लघुपटांत काम केले आहे. स्टारडम आणि सुपरस्टार या शब्दांना खऱ्या अर्थाने जगलेला एक अभिनेता म्हणून राजेश खन्नांना ओळखले जाते. एकदा राजेश खन्ना यांना सिनेसृष्टीचा दुसरा सुपरस्टार कोण होईल? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी अजिबात वेळ न घालवता माझा नातू आरव असे उत्तर दिले.
“माझी मुलगी ट्विंकल खन्ना आणि जावई अक्षय कुमार यांचा मुलगा आरव म्हणजेच माझा नातू हा सिनेसृष्टीचा दुसरा सुपरस्टार होईल,” असा अंदाज त्यांनी वर्तवला होता. राजेश खन्नांही हे उत्तर दिल्यानंतर सर्वजण चकित झाले होते. त्यावेळी त्यांना यामागचे कारण विचारण्यात आले होते.
त्यावेळी राजेश खन्ना म्हणाले, “माझा नातू हा कदाचित दुसरा सुपरस्टार असू शकतो. तो माझा नातू आहे यासाठी मी हे सांगत नाही. पण आरवमध्ये चार कलाकारांचे गुण असणार आहे. त्याच्यात माझे (राजेश खन्ना) काही ना काही गुण आहेत. त्यासोबतच त्याची आजी अभिनेत्री डिंपल कपाडिया हिचेही गुण असणारच. इतकंच नव्हे तर त्याचे वडिल अक्षय कुमार आणि माझी मुलगी ट्वींकल खन्ना यांचेही काही ना काही वैशिष्ट्ये असतील. याचाच अर्थ आरवमध्ये चार कलाकारांचे गुण असतील. त्यामुळे एखादा सुपरस्टार होण्यासाठी आवश्यक असणारे सर्व गुण त्याच्यात असतील. त्यामुळे आरव हा सिनेसृष्टीचा दुसरा सुपरस्टार असेल.”
राजेश खन्ना यांच्या चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली होती. एक कलाकार म्हणून राजेश खन्ना नेहमीच चर्चेत राहिले. पण, एक व्यक्ती म्हणूनही त्यांनी आयुष्याचा पुरेपूर आनंद घेतला. राजेश खन्ना यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले. जवळपास १८० चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला. यात ‘आराधना’, ‘दो रास्ते’, ‘खामोशी’, ‘सच्चा झूठा’, ‘गुड्डी’, ‘कटी पतंग’, ‘सफर’, ‘दाग’, ‘अमर प्रेम’, ‘प्रेम नगर’, ‘नमक हराम’, ‘रोटी’, ‘सौतन’, ‘अवतार’ या चित्रपटांचा समावेश आहे. त्यातच त्यांचा आनंद हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला होता.