प्रत्येक आई-वडिलांना आपल्या मुलांनी मोठ होऊन यश संपादित करावं, समाजात त्यांचही नाव मानानं घेतलं जावं, अस वाटतं. सामान्य मुलांकडून अशा अपेक्षा करणंही ठीक. पण, जर एखादं स्पेशल चाइल्ड असेल तर आई-वडिलांना आपल्या आशा-आकांक्षा धूसर वाटू लागतात. मात्र, पालकांनी आपल्या पाल्याला साथ दिली तर काहीच अशक्य नसतं. यावरचं भाष्य करणारा चित्रपट म्हणजे यलो. महेश लिमये दिग्दर्शित आणि रितेश देशमुखची निर्मिती असलेला चित्रपट यलो आज (४ एप्रिल) प्रदर्शित झाला. सशक्त कथा, कलाकारांचा मनाला भिडणारा अभिनय आणि तंत्रज्ञांची आशयगर्भ साथ यामुळे मराठी चित्रपट हिंदी चित्रपटांहून अधिक दर्जेदार झाला आहे. या चित्रपटात जन्मत: असलेल्या “डाऊन सिंड्रोम’मुळे “स्पेशल चाइल्ड’ असलेल्या गौरी गाडगीळचा प्रेरणादायी प्रवास मांडण्यात आला आहे.
गौरी… एक स्पेशल चाइल्ड. जन्मतःच गतिमंद जन्माला आलेल्या गौरीकडून तिच्या आई-वडिलांच्या काही अपेक्षा असतात. मात्र, त्या ती पूर्ण करू शकत नाही, अशी खंत नेहमीच तिच्या वडिलांच्या मनात असते. पण तिची आई मुग्धा (मृणाल कुलकर्णी) ही नेहमीच आपल्या मुलीला शिकवण्यात, तिची काळजी घेण्यात व्यस्त असते. आपलं मुल कसंही असलं, तरी आईचं प्रेम हे कधीच कमी होत नाही. तर दुसरीकडे समाजात आपल्या मुलीमुळे आपल्याला कधी मोठेपण किंवा सन्मान मिळू शकत नाही. त्यामुळे तिच्याकडे केवळ सहानुभूतीच्या नजरेने पाहणा-या वडिलांची भूमिका मनोज जोशी यांनी साकारली आहे. मुलीसाठी पतीपासून वेगळं झाल्यावर आपल्या मुलीचं कसं होणार? तिच पुढे भविष्य काय असणार? या प्रश्नांना मुग्धा सामोरं जात असतानाच ती गौरीला स्पेशल चाइल्डसाठी असलेल्या शाळेत घालते. मुग्धाला या सर्व निर्णयांमध्ये साथ मिळते ती तिच्या भावाची (ऋषिकेश जोशी). गौरी ही स्पेशल चाइल्ड असल्यामुळे राजकन्येच्या गोष्टी सांगून गौरीला तिचा मामा समजवत असतो. त्याचप्रमाणे तिच्या प्रत्येक खोडीतही त्याचीच साथ गौरीला मिळत असते. स्पेशल चाइल्डसाठी असलेल्या शाळेत गेल्यावर तिथल्या बाईला मुग्धाला गौरीचा पाण्याकडे असणारा कल पाहून स्विमिंगच्या क्लासला घालण्याचा सल्ला देतात. आणि इथूनच सुरु होतो तो ‘विशेष जलतरणपटू’ गौरीचा प्रवास. जितकी आई महत्वाची असते तितकाच गुरुही महत्वाचा असतो. गौरीच्या प्रवासात तिच्या स्विमिंग कोचची (उपेंद्र लिमये) साथ ही मोठा वाटा आहे. यामुळे समाजात एक स्पेशल चाइल्ड म्हणून नाही तर उत्कृष्ट आणि भारताचे प्रतिनिधित्व करणारी जलतरणपटू गौरी अशी तिची ओळख निर्माण होते.
विशेष मुलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणारा आणि धमाल मजेतून संदेश मनात उतरवून जाईल, असा ‘यलो’ चित्रपट आहे. अफलातून विषयाची समर्पक मांडणी करण्यात आली आहे. गतिमंद मुलांकडे सहानुभूतीने पाहू नका तर त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करा. विशेष मुलांचे जगणे आणि आयुष्याविषयीचा सकारात्मक दृष्टिकोन सामान्यांनाही चैतन्याने जगण्याची उभारी देणारा असतो, हाच संदेश या चित्रपटातून देण्यात ‘यलो’च्या टिमला १०० टक्के यश प्राप्त झाल आहे. पहिल्यांदाच दिग्दर्शन करणारा सिनेमॅटोग्राफर महेश लिमयेने पहिल्याच चेंडूत षटकार मारला आहे. सिनेमॅटोग्राफर असूनही दिग्दर्शन करणा-या महेशने एक उत्कृष्ट असा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीला दिला. पाण्याखाली केलेले चित्रीकरण हा मराठीतील पहिलाच आणि यशस्वी प्रयोग आहे. दिग्दर्शन आणि सिनेमॅटोग्राफी अशी दुहेरी भूमिका महेशने खूप चांगल्या रितीने साकारली आहे. यासाठी त्याचे ‘स्पेशल’ अभिनंदन करायला हवे. उपेंद्र लिमये, मृणाल कुलकर्णी, ऋषीकेश जोशी, मनोज जोशी, ऎश्वर्या नारकर, उषा नाडकर्णी असे मराठी चित्रसृष्टीतील दिग्गज कलाकार एकत्र आल्याने अभिनयाची जादू ‘यलो’ मधून बघायला मिळते. त्यातून विशेष मुलांवर हा चित्रपट आधारित आहे म्हणून अधिक भावनिक करून प्रेक्षकांच्या डोळ्यातून उगाचचं अश्रू यायला हवेत असं अजिबात यात नाही. त्यामुळे चित्रपटाची समर्पक मांडणी केल्याचे प्रकर्षाने जाणवते. बालक-पालक’ या चित्रपटाचे लेखक गणेश पंडीत आणि अंबर हडप यांनीच ‘यलो’चे लेखन केले आहे. संगीत आणि पार्श्वसंगीताची धुरा संगीतकार कौशल इनामदार यांनी सांभाळली असून गीतकार गुरू ठाकूरने लिहिलेले ‘स्पेशल’ हे गाणे स्फूर्तीदायक आहे. या चित्रपटाची विशेष गोष्ट म्हणजे हा चित्रपट एका सत्य कथेवर आधारित आहे. कथानकातील मुख्य नायिका स्वत: गौरीने साकारली आहे. बालक-पालकनंतर रितेश देशमुखची निर्मिती असलेला हा दुसरा चित्रपट. उत्कृष्ट दिग्दर्शन, कलाकार, सिनेमॅटोग्राफी, स्पेशल सारखे स्फूर्तिदायक गीत यामुळे ‘यलो’ हा चित्रपट खरचं ‘स्पेशल’ झाला आहे.

निर्माता- रितेश देशमुख, उत्तुंग हितेंद्र ठाकूर
दिग्दर्शक, सिनेमॅटोग्राफी- महेश लिमये
पटकथा- महेश लिमये, गणेश पंडीत आणि अंबर हडप
गीतकार- गुरू ठाकूर
संगीत, पार्श्वसंगीत- कौशल इनामदार
कलाकार- गौरी गाडगीळ, उपेंद्र लिमये, मृणाल कुलकर्णी, ऋषीकेश जोशी, मनोज जोशी, ऎश्वर्या नारकर, उषा नाडकर्णी, शिखर हितेंद्र ठाकूर, प्रविण तरडे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.