काळबादेवी येथील गोकुळ हाऊसला लागलेल्या आगीनंतर आठवडाभराने महापालिकेने या भागांतील इमारतींमध्ये केलेल्या बेकायदेशीर बदलांची पाहणी करून दंड ठोठावण्यास शनिवारी सुरुवात केली. सी विभागात ५८८८ इमारती असून पालिकेच्या परवाना, घनकचरा, वैद्यकीय विभाग आदी विभागांमार्फत कारवाईस सुरुवात झाली आहे.
शंभर वर्षांपूर्वीच्या इमारती, तेवढय़ाच कालावधीपासून सुरू असलेली बाजारपेठ, त्यासाठी इमारतींमध्ये केलेले बदल, लाकडी बांधकाम, अरुंद गल्लय़ा यामुळे सी काळबादेवी परिसरातील इमारती धोकादायक ठरल्या आहेत. शनिवारी पालिका अधिकाऱ्यांनी केलेल्या १९ इमारतींच्या पाहणीत दहा इमारतींमध्ये बदल केलेले आढळले. यातील १७ सदनिका व्यावसायिक वापरासाठी बदलण्यात आल्या होत्या तर चार गाळे सदनिकांमध्ये बदलण्यात आले होते. या व्यतिरिक्त १३ जणांवर पालिकेच्या ३४७ ब नियमाअंतर्गत तर १७ जणांवर एमआरटीपी कायद्यानुसार नोटीस बजावण्यात आली आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाने ४७ जणांकडून १७ हजार ८०० रुपये दंड वसूल केला. परवाना विभागाने ११ इमारतींचे परिसर तसेच ६५ गाळे तपासले. अतिक्रम विभागाच्या वरिष्ठ निरीक्षकांनीही ६४ फेरीवाल्यांवर कारवाई करत त्यांच्याकडील सामान जप्त केले. सी विभागातील इमारतींमध्ये असंख्य बदल झाले असून त्यांवर पालिकेने ही कारवाई सुरू केल्याचे विभाग अधिकारी संगीता हसनाळे यांनी सांगितले.