Bhima Koregaon controversy भीमा-कोरेगावप्रकरणावरून संपूर्ण महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रश्नावरून आता राजकीय पातळीवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्याही झडताना दिसत आहेत. त्यातच आता शिवसेनेने भारिप-बहुजन महासंघाचे प्रमुख व बुधवारी महाराष्ट्र बंद पुकारलेले प्रकाश आंबेडकर Dalit Leader Prakash Ambedkar यांच्यावर टीकास्त्र डागले आहे. प्रकाश आंबेडकर यांनी या दंगलीत तेल ओतण्यापेक्षा पाणी ओतावे व स्वतःच्या राजकीय जीर्णोद्धारासाठी या दंगलीचा वापर करू नये, असा सल्ला सेनेने दिला आहे. त्याचबरोबर राज्यात ठिकठिकाणी हिंसाचार उसळलेला असताना सरकारची भूमिका काय असा सवाल उपस्थित करत भाजपवरही निशाणा साधला. निवडणूक लढवणे आणि सरकार व पोलिसांच्या मदतीने त्या जिंकत राहणे हेच एकमेव कार्य भाजपकडून सुरू असल्याचा आरोप केला. शिवसेनेस राजकारणातून संपवण्यासाठी शक्ती पणास लावण्यापेक्षा महाराष्ट्राच्या शत्रूंशी लढा. राज्य पेटले आहे. ती शेकोटी एक दिवस तुम्हालाही खाक करील, असा इशाराही त्यांनी दिला.

 

भीमा-कोरेगाव प्रकरणावरून शिवसेनेने ‘सामना’ या आपल्या मुखपत्रातून प्रकाश आंबेडकर व भाजपवर टीका केली. पोलीस खात्याचे राजकारण व गृहखात्याचा भाजप झाल्याचे परिणाम राज्याला भोगावे लागत असल्याचे सांगत ‘शौर्य’ दिवस साजरा करण्यावरून ठिणगी पडली व त्या ठिणगीच्या ज्वालांनी राखरांगोळी होत असल्याचे म्हटले. राज्यात हिंसेला रोखण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी अग्रलेखात केला. राज्यात ठिकठिकाणी उसळलेल्या हिंसाचारात सांडलेल्या रक्ताचा प्रत्येक थेंब महाराष्ट्राचा आहे. या सर्व परिस्थितीत आज सरकारची भूमिका नक्की काय आहे? पोलीस खात्याचे राजकारण व गृहखात्याचा भाजप झाल्याचे परिणाम राज्याला भोगावे लागत आहेत. निवडणूक लढवणे आणि सरकार व पोलिसांच्या मदतीने त्या जिंकत राहणे हेच एकमेव सरकारी कार्य बनते तेव्हा राज्यातील ठिणग्यांचा हा असा उद्रेक होतो.

 

छत्रपती शिवरायांचा, महात्मा फुले, शाहू आणि डॉ. आंबेडकरांचा महाराष्ट्र जातीयतेच्या आगडोंबात जळतो आहे. आंबेडकरी बौद्ध समाज विरुद्ध ‘मराठे’ असा हा संघर्ष रस्त्यांवर भडकला आहे, पण महाराष्ट्र स्वतःशीच लढत आहे व महाराष्ट्राचे मोठेपण ज्यांच्या डोळ्यात खुपते अशांनी भडकलेल्या आगीत तेल टाकण्याचे काम सुरू केले आहे, असे म्हणत भीमा-कोरेगाव महाराष्ट्राच्या नकाशावर नेमके कुठे आहे याची माहिती कालपरवापर्यंत अनेकांना नव्हती. १८१८ साली एक युद्ध लढले गेले आणि त्या युद्धावरून २०१८ साली ‘जातीय हिंसा’ भडकवली जात असेल तर समाज २०० वर्षांत पुढे सरकलाच नाही व जातीयतेच्या डबक्यात अडकून पडला असल्याचे म्हटले.

 

भीमा-कोरेगावच्या विजयस्तंभाकडे आलेल्या जमावावर दगडफेक केली, हिंसाचार भडकवला असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी या दंगलीत तेल ओतण्यापेक्षा पाणी ओतावे व स्वतःच्या राजकीय जीर्णोद्धारासाठी या दंगलीचा वापर करू नये. दंगल भडकवण्यापेक्षा पेटलेल्या जमावास शांत करणारा व दिशा देणारा हाच खरा नेता असतो, असेही म्हटले. महाराष्ट्राचे हित ज्यांना पाहवत नाही त्यांनाच हे जातीय दंगे हवे आहेत, पण राज्याच्या फडणवीस सरकारच्या कार्यक्षमतेवर आणि भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे करणारे प्रकार आता रोजच घडू लागले आहेत. हवा बदलत आहे व बुडबुडे फुटत आहेत. भीमा-कोरेगाव दंगलीची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. दंगलीनंतर प्रत्येक राज्यकर्ता असे आदेश देतच असतो. त्यात नवे ते काय? पण दंगलखोर प्रवृत्तीचे लोक महाराष्ट्रात पडद्यामागून सूत्रे हलवीत आहेत व बाजूच्या राज्यांतील लोक आमच्या राज्यात येऊन वातावरण बिघडवत आहेत याची कल्पना राज्यकर्त्यांना असायला हवी होती, असे सांगत सरकारने आता तरी निवडणुकांच्या चक्रव्यूहातून स्वतःला सोडवावे, जमिनीवर यावे. शिवसेनेशी लढायला सारे जीवन आहे. शिवसेनेस राजकारणातून संपवण्यासाठी शक्ती पणास लावण्यापेक्षा महाराष्ट्राच्या शत्रूंशी लढा. राज्य पेटले आहे. ती शेकोटी एक दिवस तुम्हालाही खाक करील, असा इशाराही सेनेने दिला आहे.