पहिल्या टप्प्यात झालेल्या १६४ नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांच्या निकालाचा पुढील तीन टप्प्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. पहिल्या टप्प्यातील यशाने भाजपला त्याचा फायदा होऊ शकतो.
२१२ नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका एकूण चार टप्प्यांमध्ये होणार आहेत. पहिल्या टप्प्यात १६४ पालिकांच्या निवडणुका पार पडल्या. दुसऱ्या टप्प्यात १४ डिसेंबरला पुणे जिल्ह्य़ातील दहा तर लातूर जिल्ह्य़ातील चार अशा १४ नगरपालिकांच्या निवडणुका पार पडतील. तिसऱ्या टप्प्यात १८ डिसेंबरला औरंगाबाद व भंडारा जिल्ह्य़ांतील २० नगरपालिका आणि दोन नगरपंचायतींच्या निवडणुका होतील. चौथ्या टप्प्यात ८ जानेवारीला नागपूर आणि गोंदिया जिल्ह्य़ांमधील ११ नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत.
पहिल्या टप्प्यातील निवडणुकांमध्ये भाजपने मुसंडी मारली. सर्वाधिक ५१ नगराध्यक्ष आणि ८९३ नगरसेवक भाजपचे निवडून आले. जनमत भाजपच्या बाजूने असल्याचे निकालांवरून स्पष्ट झाले. पुढील टप्प्यातील निवडणुकांमध्ये या निकालाचा परिणाम होऊ शकतो. भाजपला वातावरणनिर्मिती करण्यासाठी याचा फायदा होणार आहे. उर्वरित ४७ पालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजपसाठी वातावरण अनुकूल झाल्याची प्रतिक्रिया भाजपच्या गोटातून व्यक्त करण्यात आली.
राष्ट्रवादीची कसोटी
दुसऱ्या टप्प्यात १४ डिसेंबरला पुणे जिल्ह्य़ातील १० नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. पुणे जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. बारामतीसह होणाऱ्या या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीची कसोटी लागणार आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीची पीछेहाट झाली. पश्चिम महाराष्ट्र या बालेकिल्ल्यात भाजपने शिरकाव केला. हाच कल पुण्यात कायम राहतो का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण विधानसभा निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादीला मागे टाकले होते. पुण्यात यश मिळविणे हे राष्ट्रवादीसाठी अत्यंत प्रतिष्ठेचे ठरणार आहे.
पुण्यासह औरंगाबाद आणि लातूर या मराठवाडय़ातील जिल्ह्य़ांमध्ये निवडणुका होणार आहेत. पहिल्या टप्प्यात मराठवाडय़ात भाजपची पीछेहाट झाली. राष्ट्रवादीला मराठवाडय़ात चांगले यश मिळाले. मराठवाडय़ात परिस्थिती सुधारण्याचे भाजपपुढे आव्हान राहणार आहे.
विदर्भाने भाजपला साथ दिली. नागपूर, भंडारा आणि गोंदिया तीन जिल्ह्य़ांमधील निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त नगराध्यक्षपदे आणि नगरसेवकपदे जिंकण्याचा भाजपचा प्रयत्न राहील.