पालिकेने मंजुरी दिल्यानंतरही कार्यवाही नाही
प्रसाद रावकर, लोकसत्ता
मुंबई : पालिका सभागृहाने मंजुरी दिल्यानंतरही तब्बल चार वर्ष लोटली तरी संयुक्त महाराष्ट्र लढय़ाचे प्रेरणास्थान असलेल्या ‘हुतात्मा चौका’च्या नावात ‘हुतात्मा स्मारक चौक’ अशी सुधारणा करण्यास पालिका प्रशासनाला मुहूर्त सापडलेला नाही.
मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याविरोधात अनेक मुंबईकर रस्त्यावर उतरले आणि संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभा राहिला. संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांचे मुंबईकरांना कायम स्मरण राहावे या उद्देशाने २१ नोव्हेंबर १०६१ रोजी दक्षिण मुंबईमधील फ्लोरा फाऊंटन परिसरात हुतात्मा स्मारक उभारण्यात आले. त्यानंतर २६ एप्रिल २९६३ रोजी फ्लोरा फाऊंटन परिसरातील हुतात्मा स्मारकालगतच्या चौकाचे ‘हुतात्मा चौक’ असे नामकरण करण्यात आले.
चौकाला दिलेले नाव अपूर्ण असून त्यात ‘स्मारक’ या शब्दाचा उल्लेख नसल्याबद्दल संयुक्त महाराष्ट्र
लढा स्मृती समितीचे अध्यक्ष भाऊ सावंत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. ‘हुतात्मा चौक’ऐवजी ‘हुतात्मा स्मारक चौक’ अशी सुधारणा करण्यात यावी यासाठी त्यांनी जानेवारी २०१५ रोजी तत्कालीन महापौरांना पत्र दिले होते.
तब्बल एक वर्ष महापौरदरबारी पाठपुरावा केल्यानंतर तत्कालीन नगरसेवक दिलीप लांडे यांनी मे २०१७ मध्ये ‘हुतात्मा चौका’च्या नावात सुधारणा करण्यासाठी पालिका सभागृहात ठरावाची सूचना मांडली. पालिका सभागृहाने ही ठरावाची सूचना एकमताने मंजूरही केली. पण आजतागायत या चौकाच्या नावात सुधारणा झालेली नाही, अशी खंत भाऊ सावंत यांनी व्यक्त केली आहे.
१ मे २०२० रोजी महाराष्ट्र राज्याला ६० वर्ष पूर्ण होत आहेत. हीरकमहोत्सवी वर्षांचे औचित्य साधून ‘हुतात्मा चौका’च्या नावात सुधारणा करण्यात येईल अशी अपेक्षा होती. परंतु प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे हीरकमहोत्सवी वर्षांतही चौकाच्या नावात सुधारणा होऊ शकलेली नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे.
टपाल तिकिटालाही प्रतीक्षा
संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हौतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी हुतात्मा स्मारक टपाल तिकीट प्रकाशित करावे, अशी मागणी गेली २० वर्षे करण्यात येत आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडे याबाबत अनेक वेळा पाठपुरावाही करण्यात आला. मात्र ही मागणीही प्रलंबित आहे. आता मुख्यमंत्र्यांनीच यात लक्ष घालावे, अशी मागणी सावंत यांनी केली आहे.