बेरोजगार मराठी तरुणांना रोजगाराचे गाजर दाखवत शिवसेनेकडून देण्यात आलेल्या शिव वडापावच्या गाडय़ांना पालिकेने परवाना दिलेला नाही, असे अनुज्ञापन विभाग आणि आरोग्य विभागानेच स्पष्ट केल्याने या गाडय़ा अनधिकृत असल्याचे उघड झाले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही शिव वडापावच्या विरोधात मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राष्ट्रवादी थेट न्यायालयात धाव घेणार असल्याने  शिवसेना अचडणीत येण्याची चिन्हे आहेत.
शिव वडापावच्या गाडीस परवानगी दिली आहे का, अशी विचारणा राष्ट्रवादीचे गटनेते धनंजय पिसाळ यांनी पालिकेच्या अनुज्ञापन विभाग आणि आरोग्य विभागाकडे केली होती. या दोन्ही विभागांनी परवानगी दिली नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या अनधिकृत गाडय़ांविरुद्ध न्यायालयात धाव घेण्याची तयारी धनंजय पिसाळ करीत आहेत.
बेरोजगार मराठी तरुणांसाठी शिवसेनेने शिव वडापाव योजना जाहीर केली होती. याबाबतचा ठराव शिवसेनेने संख्याबळाच्या जोरावर पालिका सभागृहात मंजूर करून घेतला. मात्र पालिका प्रशासनाकडून अद्याप या योजनेला मान्यता मिळालेली नाही. असे असतानाही इच्छुक बेरोजगार तरुणांकडून ६५ हजार रुपये घेऊन शिव वडापावचा स्टॉल देण्यात येत असून त्याबाबत सेनेच्या नगरसेवकांनी कबुलीही दिली होती. सध्या मुंबईत शिव वडापावच्या २५० गाडय़ा सुरू आहेत. त्या गाडय़ांसाठी अनुज्ञापन आणि आरोग्य विभागाच्या परवानगीची गरज आहे. मात्र त्याशिवायच मुंबईत शिव वडापावच्या गाडय़ा सुरू करण्यात आल्या आहेत.
प्रशासनाने सध्या मुंबईतील फेरीवाल्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. फेरीवाल्यांविरुद्धची कारवाई थांबवावी, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली होती. मात्र प्रशासनाकडून त्यास नकार मिळाल्याने विरोधकांनी शिव वडापावच्या गाडय़ांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. प्रशासनाने फेरीवाल्यांबरोबरच शिव वडापावच्या गाडय़ांवरही कारवाई करावी, अशी मागणी विरोधक करू लागले आहेत. शिव वडापावच्या गाडय़ांवर कारवाई होत नसल्याने काँग्रेसने कांदेपोह्याची गाडी सुरू करून शिवसेना आणि प्रशासनास प्रत्युत्तर दिले आहे. तर शिव वडापावच्या गाडय़ांविषयी राष्ट्रवादीने माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे.