शहराची ओळख आणि जागतिक वारसास्थळ असलेल्या छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्थानक  व महानगरपालिकेचे मुख्यालय यांची छायाचित्रे घेण्यासाठी आणि हा परिसर नीट पाहण्यासाठी महानगरपालिका निरीक्षण स्थळ उभारणार आहे. स्थानकाच्या पश्चिम दिशेला भूमिगत मार्गाच्या वर निरीक्षण स्थळासाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. महापालिका आयुक्तांनी सोमवारी सीएसटी, आझाद मैदान, चर्चगेट परिसरात फिरून या ठिकाणच्या नागरी सुविधांची पाहणी केली, त्या वेळी या स्थळासंबंधीचा प्रशासकीय प्रस्ताव तयार करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

सीएसटी स्थानक तसेच महानगरपालिकेचे मुख्यालय असलेल्या परिसरात दररोज हजारो पर्यटक भेट देत असतात. या दोन्ही इमारतींची छायाचित्रे काढण्यासाठीही खूप गर्दी होते. काही वेळा संपूर्ण इमारतीचे छायाचित्र घेण्यासाठी रस्त्याच्या मधोमधही पर्यटक उभे राहतात. हा वाहनांच्या वर्दळीचा रस्ता असल्याने पर्यटकांना हा परिसर नीट पाहता येत नाही आणि वाहतुकीलाही अडथळे येतात. त्यावर पालिकेने निरीक्षण स्थळ उभारण्याचा पर्याय शोधला असून पालिकेच्या समोरच सीएसटी स्थानकाच्या पश्चिमेला भूमिगत पादचारी मार्गाच्या वर निरीक्षण स्थळ उभा करण्याचा आराखडा पालिका अधिकाऱ्यांनी तयार केला आहे. या स्थळासाठी तातडीने प्रस्ताव करून काम मार्गी लावण्याच्या सूचना आयुक्तांनी मंगळवारी सकाळी दौऱ्यादरम्यान दिला. या निरीक्षण स्थळासोबतच सीएसटी स्थानकाबाहेरच्या भाटिया बागेतून पादचारी मार्ग टाकण्याचेही पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत.

फॅशन स्ट्रीटच्या समोरच्या पदपथावर महानगरपालिकेच्या विविध खात्यांच्या चौक्या आहेत. या चौक्यांमुळे आझाद मैदानाचा परिसर झाकला जात असल्याने त्यांची काचेच्या भिंतींचा वापर करून पुनर्बाधणी करण्याचे आदेश आयुक्त मेहता यांनी दिले. नूतनीकरण करण्यात आलेल्या चर्चगेट रेल्वे स्थानकाचीही पाहणी करण्यात आली. इंडियन र्मचट चेंबरसमोरील चर्चगेट रेल्वे स्थानकाला लागूनच असलेल्या सार्वजनिक शौचालयातील अस्वच्छतेबाबत आयुक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या शौचालयाबाबत तातडीने कार्यवाही करून त्याच्या बाजूने वीर नरिमन मार्गालगत पदपथ तयार करण्याबाबतही आराखडा तयार करण्यास आयुक्तांनी अधिकाऱ्यांना सांगितले.