मुंबई : पंजाब नॅशनल बँक  घोटाळ्यातील फरारी आर्थिक गुन्हेगार नीरव मोदी याच्या कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्याला करोनाच्या पार्श्वभूमीवर जामीन देण्यास सीबीआय न्यायालयाने नकार दिला.

नीरव मोदीच्या मालकीच्या ‘फायरस्टार इंटरनॅशनल’ कंपनीत अर्जुन पाटील हा वरिष्ठ कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होता. कर्जासाठी बनावट कागदपत्रे तयार करण्याच्या आरोपाअंतर्गत फेब्रुवारी २०१८ मध्ये त्याला अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तो कारागृहात आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर जामीन देण्याची मागणी त्याने केली होती. पाटीलला करोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर वजन घटण्यासह त्याला थकवा जाणवत आहे. तो स्वत:ची काळजी घेण्यास असमर्थ असल्यामुळे आरोग्याच्या कारणास्तव त्याची जामिनावर सुटका करण्याची मागणी पाटीलच्या वकिलांनी केली होती. मात्र सरकारकडून कैद्यांची योग्य ती काळजी घेतली जात असल्याचे नमूद करत विशेष न्यायालयाने पाटील याची जामीन देण्याची मागणी फेटाळली.