रेल्वे स्थानकात बारा व पंधरा डबा लोकल थांबवताना मोटरमनचा होणारा गोंधळ पाहता काही बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. दादर, अंधेरी, नालासोपारा स्थानकातील धिम्या व जलद फलाटावर थांबणाऱ्या लोकल काही मीटर अंतरावर पुढे जाऊन थांबणार आहेत. त्यामुळे प्रवाशांची लोकल पकडताना एकच धांदल उडेल.

दादर स्थानकात डाऊन जलद मार्गावरील फलाट क्रमांक तीनवर १२ डबा लोकलच्या थांब्यात बदल करून १०० मीटर अंतरावर पुढे जाऊन थांबत होती. या बदलामुळे प्रवाशांचा लोकल पकडताना गोंधळ उडत होता. हा बदल मागे घेण्याची मागणी होत असतानाही त्यात या वेळी बदल केलेला नाही. आता १०० मीटरऐवजी ६६ मीटर पुढे अंतरावरच जाऊन लोकल थांबेल, अशी माहिती पश्चिम रेल्वेने दिली. अंधेरी स्थानकातही अप जलद मार्गावरील फलाट क्रमांक सातवर बारा डबा लोकल चर्चगेटच्या दिशेने दहा मीटर पुढे थांबेल. तर १५ डबा लोकल याच फलाटावर जोगेश्वरीच्या दिशेने ५२ मीटर मागे थांबणार आहे. नालासोपारा स्थानकातही बारा डब्यांच्या थांब्यात प्रशासनाने बदल केले आहेत. नालासोपारा स्थानकात अप धिम्या मार्गावरील फलाट क्रमांक २ वर चर्चगेटच्या दिशेने ६६ मीटर पुढे लोकल थांबेल, अशी माहिती पश्चिम रेल्वेने दिली. बदल १९ नोव्हेंबरपासून लागू केले जाणार आहेत.