करोना महासाथीने सर्वच क्षेत्रांत मोठी उलथापालथ घडविली असून, गुंतवणूकविश्वाला काही नव्या संज्ञा-संकल्पनांची ओळख या काळाने करून दिली. गुंतवणूकदारांनी समभाग निवड करताना परंपरागत निकषांबरोबरीने बदललेल्या काळाची गरज म्हणून काही नव्या निकषांचा अंतर्भाव करायला हवा, असे प्रतिपादन गुंतवणूक विश्लेषक आणि स्तंभलेखक अजय वाळिंबे यांनी ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ कार्यक्रमात केले.
नव्याने लक्षात घ्यावयाच्या निकषांमध्ये, विस्तृत उपभोगमूल्य आणि मागणीवर परिणाम होऊनही नफाक्षमतेचे प्रमाण स्थिर राखू शकलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक सर्वात सुरक्षित मानली जायला हवी, असे वाळिंबे यांनी सुचविले. एकीकडे तेजीने भारावलेपण तर दुसरीकडे संभ्रम अशा सध्याच्या भांडवली बाजाराच्या विचित्र अवस्थेबद्दल ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ वेबसंवादाला हजेरी लावणाऱ्या वाचकांनीही वाळिंबे यांना त्यांच्या मनातील प्रश्न विचारले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘लोकसत्ता’चे वरिष्ठ संपादक सिद्धार्थ खांडेकर यांनी केले, तर सूत्रसंचालन व समन्वयाची भूमिका सचिन रोहेकर आणि वीरेंद्र तळेगावकर यांनी निभावली.
सध्या भांडवली बाजार धोक्याच्या पातळीवर भासत असला, तरी नजीकचा काळ आशावाद जागविणारा असून ‘सेन्सेक्स-निफ्टी’तील तेजीची दौड त्याचेच प्रतिनिधित्व करते. भारत-चीन सीमेवरील वाढता तणाव चिंतेची बाब असली, तरी चीनबद्दलची जगभरात वाढती प्रतिकूलता आणि बिघडलेले व्यापार संबंध भारताच्या पथ्यावरही पडतील, असे वाळिंबे यांनी सांगितले.
केंद्राची ‘आत्मनिर्भर भारत’ योजना नेमक्या वेळी आली असून, देशी उद्योगांना संरक्षण आणि प्रोत्साहनाची हमी तिने दिली. परंतु बरोबरीने निर्यात प्रोत्साहन, देशांतर्गत मागणीत वाढीला चालना आणि करविषयक सवलतीही देण्याची गरज आहे. ती सरकारकडून येत्या काळात दिली जाईल, या आशेने दिवाळीपर्यंत बाजार वरच्या दिशेने प्रवास सुरू ठेवेल. नोव्हेंबरमध्ये करोना प्रतिबंधक लस आली तर बाजारात उत्साहाचा ‘डबल बार’ उडेल
– अजय वाळिंबे, गुंतवणूक विश्लेषक
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 9, 2020 12:07 am