पोलिसांचा अहवाल मानवी हक्क आयोगाला सादर
मुंबई : सोमय्या महाविद्यालयातील एका प्राध्यापक महिलेचा लैंगिक छळ केल्याचा आरोप असलेल्या प्राचार्य राजपाल हांडे यांच्याविरोधात न्यायालयात लवकरच आरोपपत्र दाखल केले जाईल, असा अहवाल टिळक नगर पोलीस ठाण्याच्या वतीने महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाला सादर करण्यात आला आहे. या प्रकरणात हांडे यांना नुकतीच अटक करण्यात आली असून त्यांना सध्या जामिनावर सोडण्यात आल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे.
सोमय्या महाविद्यालयातील लैंगिक छळ प्रकरणी प्राध्यापक महिलेने राज्य मानवी हक्क आयोगाकडे तक्रार केली आहे. त्या संदर्भात शुक्रवारी आयोगाकडे सुनावणी झाली. या प्रकरणात टिळकनगर पोलिसांनी काय कारवाई केली, त्याचा अहवाल आयोगाला सादर करण्यात आला. १७ जानेवारीला राजपाल हांडे यांना अटक करून सत्र न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामिनावर सोडण्यात आले.
या गुन्ह्य़ाचा तपास सुरू आहे. राजपाल हांडे यांच्या विरोधात पुरावे प्राप्त झाले असून त्यांच्या विरोधात लवकरात लवकर विक्रोळी येथील महानगर दंडाधिकारी यांच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल केले जाईल, असे टिळक नगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सरिता चव्हाण यांनी आयोगाला सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे.
जुहू पोलिसांविरोधात तक्रार : राजपाल हांडे सध्या मिठीबाई महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत. त्या महाविद्यालयातही एका कार्यक्रमाशी संबंधित बैठकीच्या वेळी हांडे यांनी आपल्याशी असभ्य वर्तन केल्याचा आरोप मानसशास्त्रातील तज्ज्ञ महिलेने केला आहे. हे प्रकरण २०१६ मधील असून, त्याचवेळी त्यांनी महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाकडे तक्रार केली होती. मात्र त्याची दखल घेतली नाही, त्यामुळे जूहू पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. मात्र गेल्या वर्षभरात पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही, त्याबद्दल त्या महिलेने राज्य मानवी हक्क आयोगाकडे गुरुवारी अर्ज दाखल केला आहे.