सरकारकडून ५०० आणि १००० रूपयांच्या नोटांवर बंदी घालण्यात आल्यामुळे सध्या दैनंदिन व्यवहार करताना नागरिकांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मात्र, रुग्णालय, मेडिकलमध्ये जुन्या नोटा स्वीकारल्या जातील असे सरकारने जाहीर केले आहे. तरीदेखील पेट्रोलपंप आणि रूग्णालयात सदर जुन्या नोटा नाकारण्याचे प्रकार सर्रासपणे घडत आहेत. या अनुषंगाने नागरिकांना काही अडचणी निर्माण होत असल्यास त्यांच्या मदतीसाठी व्हॉटसअॅप नंबर, हेल्पलाईन नंबर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या माध्यमातून एसएमएस, कॉल किंवा व्हॉटसअॅप करून नागरिकांना आपल्या तक्रारी मांडता येणार आहेत. त्यांच्या अडचणींबाबत संबंधित प्राधिकरणाला कळवून अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे पत्रक राज्याच्या पोलीस महासंचालकांकडून जारी करण्यात आले आहे.

नोटबंदीच्या निर्णयानंतर बँकेबाहेर गर्दी वाढली असून सर्वसामान्यांची गैरसोय टाळण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचा दावा केंद्र सरकारकडून केला जात आहे. पण केंद्र सरकारचा हा निर्णय नागरिकांच्या जीवावर बेतू लागला आहे. गेल्या सहा दिवसांत नोटबंदीच्या निर्णयामुळे २५ जणांचा मृत्यू झाला आहे. पैशांअभावी उपचार न मिळणे, पैसे नसल्याने निराश होऊन आत्महत्या केल्याच्या घटनांचा यामध्ये समावेश आहे. नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर रोजी पाचशे आणि हजारच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानंतर चलनाचा तुटवडा निर्माण झाला असून व्यवहारही मंदावले आहेत. याचा फटका गोरगरीब वर्गाला बसत असून पैसे नसल्याने आत्महत्या केल्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.

whatsapp-image-2016-11-15-at-13-24-45 whatsapp-image-2016-11-15-at-13-24-461