दोन्ही रेल्वेगाडय़ांमध्ये केवळ पाच मिनिटांचे अंतर  डबलडेकर पहाटेऐवजी रात्री सोडण्याची मागणी

मुंबईहून कोकणात जाण्यासाठी वातानुकूलित डबलडेकर गाडी याआधी दोन वेळा मध्य रेल्वेच्या चुकीच्या निर्णयांमुळे सपशेल अपयशी ठरल्यानंतर या चुकांमधून धडा न घेण्याचा निर्धार मध्य रेल्वेने केला आहे. कोकणासाठी नवीन वातानुकूलित डबलडेकर गाडी सुरू करताना मध्य रेल्वेने याच वेळी फक्त पाच मिनिटांच्या फरकाने दादरहून सुटणाऱ्या जनशताब्दी एक्स्प्रेसकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे डबलडेकरच्या प्रवाशांची पावले जनशताब्दी एक्स्प्रेसकडे पडत आहेत. विशेष म्हणजे त्यानंतर या गाडीला अल्प प्रतिसाद मिळाल्यास ही गाडी न चालवण्याचा टोकाचा निर्णय घेण्यास मध्य रेल्वेतील अधिकारी सज्ज आहेत.
कोकण मार्गावर वातानुकूलित डबलडेकर चालवण्यासाठी मध्य रेल्वेने गेल्या वर्षी गणेशोत्सवाचा मुहूर्त शोधला आणि प्रीमियम दरांत ही गाडी चालवली. त्या वेळी चिपळूणजवळ मालगाडी घसरल्याने आणि प्रवाशांना हे दर प्रचंड वाटल्याने या गाडीला अल्प प्रतिसाद मिळाला. त्यानंतर रेल्वेने दिवाळीत ही गाडी पुन्हा सुरू केली होती. मात्र दिवाळीच्या काळात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी असल्याने पुन्हा मध्य रेल्वेचा निर्णय चुकला होता.
आता ही गाडी सकाळी साडेपाचच्या सुमारास लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सोडण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. मडगावला जाणारी जनशताब्दी एक्सप्रेस ५.२५ वाजता दादर स्थानकातून रवाना होते. या दोन्ही गाडय़ा एकामागोमाग एक आहेत. तसेच जनशताब्दी एक्स्प्रेस मडगावला दुपारी २.०५ वाजता पोहोचते, तर डबलडेकर गाडी संध्याकाळी ५.३० वाजता पोहोचते. तसेच पहाटेच्या वेळी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचणे लोकांसाठी तापदायक असल्याने प्रवासी जनशताब्दी गाडीला पसंती देतील, असे कोकण रेल्वे प्रवासी एकता महासंघातर्फे सांगण्यात आले.

पहिल्या दिवशी ५२ टक्के आरक्षण
कोकणवासीयांसाठी नेहमीच्या दरांत वातानुकूलित डबलडेकर गाडी चालू केल्यानंतर मुंबईहून ही गाडी पहिल्यांदा रवाना होताना निम्म्यापेक्षा जास्त जागांचे आरक्षण झाले होते. पहिल्या दिवशी एकूण क्षमतेच्या ५२ टक्के म्हणजेच ८९० प्रवाशांनी गाडीतून प्रवास केल्याचे मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. आलोक बडकुल यांनी सांगितले. ख्रिसमस आणि नववर्षांच्या कालावधीत या गाडीला मिळणारा प्रतिसाद जास्त असेल. त्यानंतर जानेवारीपासून नियमित प्रवाशांची मागणी लक्षात येईल, असेही डॉ. बडकुल यांनी सांगितले.