खासदार संजय राऊत यांचे आवाहन

मुंबई : अयोध्येत भव्य राममंदिर व्हावे, अशी इच्छा असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह सर्व हिंदुत्ववादी संघटना, अन्य राजकीय पक्ष आणि काँग्रेसनेही शिवसेनेच्या राममंदिर उभारणी मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन खासदार संजय राऊत यांनी सोमवारी केले.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे २५ नोव्हेंबरला अयोध्येला जात असून या मोहिमेत सहभागी होण्यासाठी शिवसेना राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह अन्य राजकीय पक्षांनाही आमंत्रणे पाठविणार असल्याचे राऊत यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

उद्धव ठाकरे अयोध्येतील राममंदिरात २५ नोव्हेंबरला जाऊन दर्शन घेणार आहेत. तेथे त्यांची सभाही होणार आहे. वादग्रस्त जागी भव्य राममंदिर उभारण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. नियोजित मंदिर न्यासाचे महंत व अन्य पदाधिकाऱ्यांनी ठाकरे यांना आमंत्रित केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही राममंदिर उभारणीसाठी आक्रमक भूमिका घेतली असून वेळ पडल्यास आंदोलन करण्याचाही इशारा दिला आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी ठाकरे यांचे घनिष्ठ संबंध आहेत आणि हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर त्यांचे मतैक्य आहे. या पाश्र्वभूमीवर शिवसेनेने संघाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनीही मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेनेने केले आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हेही हल्ली मंदिरांमध्ये जातात. त्यामुळे त्यांच्यासह अन्य राष्ट्रीय पक्ष व प्रादेशिक पक्षाच्या नेत्यांनाही राममंदिराच्या मोहिमेत सहभागी होण्यासाठी आमंत्रित करणार असल्याचे राऊत यांनी सांगितले. राममंदिर व्हावे, अशी देशभरातील हिंदुत्ववाद्यांची भूमिका आहे. हा पक्षीय मुद्दा नसून ज्यांना अयोध्येत भव्य राममंदिर व्हावे, असे वाटते, त्या सर्वानी शिवसेनेला पाठिंबा द्यावा, असे राऊत म्हणाले. शिवसेनेची अयोध्या मोहिमेची तयारी जोरात सुरू आहे. शिवसेनेचे मंत्री, आमदार, खासदार यांच्यावर विविध जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. राऊत यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची नुकतीच भेट घेऊन चर्चाही केली.

आक्रमक हिंदूत्ववादी पक्ष

उद्धव ठाकरे यांचे तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी, तेलगू देसमचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू आणि अन्य राजकीय पक्षांच्या नेत्यांशीही चांगले संबंध आहेत. शिवसेना प्रादेशिक पक्ष असला तरी राममंदिराच्या निमित्ताने हिंदूत्ववादाचा आक्रमक पुरस्कार करणारा पक्ष, अशी राष्ट्रीय पातळीवर प्रतिमा निर्माण व्हावी, असे शिवसेनेचे प्रयत्न असल्याचे सूत्रांनी सांगितले.