‘यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग’ आणि ‘वांद्रे-वरळी राजीव गांधी सागरी सेतू’वर २६ जानेवारीपासून फास्टॅग प्रणालीची १०० टक्के  अंमलबजावणी होईल. सुरुवातीला मर्यादित काळासाठी काही मार्गिका (रोख आणि फास्टॅग दोन्ही सुविधा) स्वरूपाच्या असतील, पण त्यानंतर सर्व मार्गिकांवर फास्टॅग वापरून पथकर भरावा लागेल.

‘केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्रालया’ने महामार्गावर फास्टॅग बंधनकारक करण्याचे जाहीर केले आहे. त्या अनुषंगाने ‘महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळा’च्या (एमएसआरडीसी) अखत्यारीतील मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आणि वांद्रे-वरळी सागरी सेतूवर फास्टॅग यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. ‘या दोन्ही मार्गाच्या पथकर नाक्यांवर फास्टॅगधारक वाहनांना प्राधान्य राहील. मर्यादित कालावधीसाठी काही मार्गिका हायब्रीड (रोख आणि फास्टॅग) स्वरूपातील असतील. त्या मार्गिकेमध्ये फास्टॅग नसलेले वाहनधारक रोख रकमेने पथकर भरणा करू शकतात; पण त्यांना पथकर नाक्याजवळील स्टॉलवरून फास्टॅग विकत घेऊन गाडीवर लावावा लागेल,’ असे एमएसआरडीसीचे सह-व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे यांनी सांगितले. फास्टॅग मार्गिकेमध्ये फास्टॅग नसलेल्या अथवा काळ्या यादीतील टॅग असलेल्या वाहनांनी प्रवेश केल्यास दुप्पट पथकर भरावा लागेल.

फास्टॅगधारक वाहनांची संख्या वाढविण्यासाठी महामंडळाने ११ जानेवारीपासून या दोन्ही मार्गावर कार, जीप व एसयूव्ही फास्टॅग वाहनधारकांना प्रत्येक फेरीला ५ टक्के  सवलत देण्याची प्रोत्साहनपर योजना सुरू केली आहे. गेल्या पंधरा दिवसांत या योजनेला मोठा प्रतिसाद मिळत असून फास्टॅगधारक वाहनांची संख्या वाढत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.