आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना महायुतीत आणण्याबाबत शिवसेना व रिपब्लिकन पक्ष यांच्यात ‘फिक्सिंग’ झाल्याचे समजते. पुढील वर्षांच्या प्रारंभी होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकांचीही काही गणिते त्यामागे आहेत.रामदास आठवले यांना लोकसभेपेक्षा राज्यसभेवर जाणे सोयीचे वाटत आहे. आठवले यांचा राज-विरोध मावळण्यामागे ही काही महत्त्वाची कारणे सांगितली जात आहेत. राज यांनी महायुतीत यावे या आठवले यांच्या विधानामागील बोलवता धनी शिवसेनेतच असल्याचे बोलले जात आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांनी एकत्र यावे अशी चर्चा सुरु झाली. भाजपने तर त्याआधीच राज ठाकरेंना युतीसोबत घेण्याचे आवाहन केले होते. राज यांना महायुतीत घेण्याबाबत चर्चा व हालचाली सुरु झाल्या, त्यावेळी आठवले मात्र अस्वस्थ झाले होते. मनसेला सोबत घेणार असाल तर महायुतीत राहण्याबाबत फेरविचार करण्याचा इशाराही त्यांनी दिला. मात्र त्यावर सेना किंवा भाजपकडून काहीही मत व्यक्त करण्यात आले नाही.
दरम्यान, आठवले यांनी आपली स्वतंत्र ताकद दाखविण्यासाठी १ मे पासून विभागवार सभा घेण्याचा सपाटा लावला. या सभांपासून त्यांनी पहिल्यांदाच सेना-भाजपच्या नेत्यांना दूर ठेवले.
गेल्या आठवडय़ात शिवसेनेच्या एका वरिष्ठ नेत्याची व रामदास आठवले यांची बैठक झाली. या बैठकीचा फारसा गाजावाजा झाला नाही. परंतु राज ठाकरे यांना महायुतीत येण्याचे आवाहन आठवले यांनी त्यांच्या सभेतूनच करावे असे त्या बैठकीतच ठरल्याचे कळते. त्याची चोख अंमलबजावणी आठवले यांनी कुर्ला येथे रविवारी पार पडलेल्या सभेत केली.
कॉंग्रेस-राष्ट्रवादीला टक्कर देण्यासाठी
काँग्रेस-राष्ट्रवादीला टक्कर द्यायची तर मनसेला दूर ठेवणे परवडणारे नाही, याचा अंदाज घेऊनच सेना-आरपीआयने हे नवे डावपेच टाकल्याचे सांगितले जाते. त्याचबरोबर पुढील वर्षी राज्यसभेच्या काही जागांसाठी निवडणुका होणार आहेत. शिवसेनेकडून आठवले यांचा विचार या वेळी केला जाण्याची शक्यता आहे. त्यासाठीही मनसेची मदत लागणार आहे. केवळ लोकसभा व विधानसभाच नव्हे तर राज यांना महायुतीत आणण्याच्या मागे राज्यसभेच्या निवडणुकांचेही गणित असल्याचे सांगितले जाते.