मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन; मराठी विद्यापीठ जागेचा करार ‘ग्रंथाली’ला सुपूर्द

मुंबईतील वांद्रे येथे उभारण्यात येणाऱ्या मराठी भाषेच्या राज्यातील पहिल्या विद्यापीठाच्या जागेचा करार मंगळवारी मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ग्रंथालीला विधान भवनातील कार्यक्रमात देण्यात आला. मराठी ही ज्ञानभाषा व्हावी म्हणून प्रयत्न करण्याची गरज सर्वच साहित्यप्रेमींकडून आणि साहित्यिकांकडून व्यक्त केली जाते. तीच सरकारचीही भूमिका आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.

मराठी भाषेचे विद्यापीठ मुंबईत व्हावे यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची विनंती ग्रंथालीने मुंबई भाजप अध्यक्ष व आमदार अ‍ॅड. आशीष शेलार यांच्याकडे केली होती. त्यानुसार पाठपुरावा करून आशीष शेलार यांनी आपल्या वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघात बॅण्डस्टॅण्ड येथे महापालिकेची जागा त्यासाठी उपलब्ध करून दिली. मंगळवारी मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने विधान भवनातील कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ग्रंथालीचे संस्थापक दिनकर गांगल यांच्याकडे हा करार सुपूर्द करण्यात आला.

त्याचबरोबर दोन वर्षांपूर्वी मुंबई महापालिकेने अचानक ग्रंथालीला विद्यमान कार्यालयाची जागा रिकामी करण्याची नोटीस दिली होती. त्यानंतर शेलार यांनी त्यासाठी पाठपुरावा केला. त्यानुसार ग्रंथालीच्या कार्यालयासाठी माहीम टायकलवाडी येथील जागेचा करारही ग्रंथालीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.

ग्रंथाली ही एक वाचक चळवळ आहे. गेली अनेक वर्षे ज्ञानाच्या क्षेत्रात ग्रंथाली काम करते आहे, पण दुर्दैवाने महापालिकेच्या एका निर्णयामुळे त्यांना कार्यालय रिकामे करण्याची नोटीस दिली गेली. त्यांना नव्या जागेचा करार देताना व मराठीच्या विद्यापीठाचा करार सुपूर्द करताना आनंद होत आहे. मराठी भाषेचे काम करणाऱ्या उपक्रमाला आवश्यक ती मदत यापुढे सरकारकडून करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

या वेळी मराठी भाषा व सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, आशीष शेलार यांच्यासह पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, कवी डॉ. महेश केळुसकर, सुदेश हिंगलासपूरकर, अरुण जोशी, धनंजय गांगल, मोहन खैरे, धनश्री धारप, लतिका भानुशाली, दिलीप चावरे आदी उपस्थित होते.

मराठीला लवकरच अभिजात दर्जा

मराठी भाषेवर अभिजात भाषेच्या दर्जाची मोहोर लवकरच उमटेल. आम्ही त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी केल्या असून केंद्र सरकारकडे याबाबत पाठपुरवा करत आहोत, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या शिष्टमंडळाला दिली. या वेळी मराठी भाषा व सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडेही उपस्थित होते. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून तातडीने घेण्यात यावा, या मागणीसाठी कोमसापतर्फे स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली होती. यातून जमा झालेल्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन मुख्यमंत्री फडणवीस यांना विधान भवनात देण्यात आले. कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, विद्यमान केंद्रीय अध्यक्ष डॉ. महेश केळुसकर यांच्यासह मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अ‍ॅड. आशीष शेलार यांचा शिष्टमंडळात समावेश होता. तसेच ग्रंथालीचे दिनकर गांगल यांच्यासह अन्य साहित्यप्रेमी या वेळी उपस्थित होते.