‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’साठी (आयआयटी) २ जून रोजी घेण्यात आलेल्या ‘जेईई-अ‍ॅडव्हान्स’ या प्रवेश परीक्षेची उत्तरतालिका आणि तपासलेल्या उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांच्या माहितीकरिता संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
जेईई-अ‍ॅडव्हान्सच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना ‘पेपर-१’ आणि ‘पेपर-२’ची उत्तरतालिका आणि आपल्या तपासलेल्या उत्तरपत्रिका पाहता येतील. विद्यार्थ्यांना आपल्या गुणांविषयी अथवा एखाद्या प्रश्नाच्या मूल्यांकनाविषयी शंका असल्यास त्यांना पुनर्मूल्यांकन अथवा फेरतपासणीसाठी अर्ज करता येणार आहे. हे अर्ज १४ ते १७ जून दरम्यान विद्यार्थ्यांना आपले करता येतील. पण, पुनर्मूल्यांकनाचा मामला विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्टय़ा भारी पडणार आहे. कारण प्रत्येक प्रश्नाच्या मूल्यांकनासाठी विद्यार्थ्यांना ५०० रुपये मोजावे लागणार आहेत.
जेईई-अ‍ॅडव्हान्सचा अंतिम निकाल २३ जूनला जाहीर करण्यात येणार आहे. देशभरातील १६ आयआयटी आणि धनबादच्या आयएसएम संस्थेतील प्रवेश जेईई-अ‍ॅडव्हान्सच्या गुणांवर निश्चित केले जाणार आहेत. त्यासाठी २४ ते ३० जून दरम्यान विद्यार्थ्यांकडून पसंतीक्रम भरून घेतले जातील. ४ जुलैला जागा वाटप जाहीर केले जाईल. आर्किटेक्टचर अभ्यासक्रमा-साठीची प्रवेश परीक्षा २८ जूनला होणार आहे. मुंबई, दिल्ली, गुवाहाटी, कानपूर, खरगपूर, मद्रास आणि रूरकी या ठिाकणी सकाळी ९ ते दुपारी १२ या दरम्यान ही परीक्षा होईल. या परीक्षेसाठी २४ आणि २५ जूनला जेईई-अ‍ॅडव्हान्सच्या संकेतस्थळावरच विद्यार्थ्यांना नोंदणी करायची आहे.