07 June 2020

News Flash

अंबरनाथमध्ये लोकलचा पेंटाग्राफ तुटला, मुंबईकडे येणारी रेल्वे वाहतूक ठप्प

प्रवाशांचे हाल

प्रतिकात्मक छायाचित्र

अंबरनाथ स्टेशनवर लोकलचा पेंटाग्राफ तुटल्याने मध्य रेल्वेची कर्जत- कल्याण दरम्यानची रेल्वे वाहतूक ठप्प झाली. लोकल ट्रेन खोळंबल्याने बदलापूर आणि अंबरनाथ स्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढली आहे. सुमारे दीड तास मुंबईच्या दिशेने एकही लोकल रवाना न झाल्याने या मार्गावरील प्रवाशांचे हाल होत आहेत.

शनिवारी दुपारी पावणे तीनच्या सुमारास कर्जतहून मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी लोकल ट्रेन अंबरनाथ स्टेशनवर येत असताना लोकलचा पेंटाग्राफ तुटला. या घटनेत एक प्रवासी किरकोळ जखमी झाला. जोरदार आवाज आल्याने काही क्षणांसाठी भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. जखमी प्रवाशावर प्राथमिक उपचार करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर आहे.

पेंटाग्राफ तुटल्याने अंबरनाथ स्टेशनवरुन मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक ठप्प झाली. दीड तासांपासून मुंबईकडे एकही लोकल रवाना न झाल्याने अंबरनाथ, बदलापूर आणि वांगणी या स्थानकांवरील गर्दी वाढली आहे. कल्याण ते कर्जत या मार्गावर वाहतूक सुरळीत आहे. मात्र कर्जतहून मुंबईकडे येणारी सेवा विस्कळीत झाली.

शनिवारी सकाळी पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. ठाणे, कांजूरमार्ग- भांडूप येथे रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने रेल्वे वाहतूक मंदगतीने सुरु होती. पावसाचा जोर ओसरल्यावर वाहतूक पूर्ववत होण्याची चिन्हे असतानाच अंबरनाथजवळ पेंटाग्राफ तुटला आणि रेल्वे प्रवाशांचे पुन्हा हाल सुरु झाले.

दरम्यान, शनिवारी पावसामुळे आणि तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांचे हाल झाले असले तरी उद्यादेखील (रविवारी)  मध्य रेल्वेवरील प्रवाशांची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे आहेत. ठाकुर्ली येथे रोड ओव्हर ब्रिजसाठी गर्डर टाकण्याचे काम केले जाणार आहे. या कामासाठी रविवारी सकाळी ९.१५ ते १२. ४५ या कालावधीत डोंबिवली ते कल्याण दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद असेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 19, 2017 4:40 pm

Web Title: local pentagraph breaks down in ambarnath railway service on karjat kalyan route affected
Next Stories
1 ‘आयव्हीएफ’चे जाळे विस्तारले!
2 पालिकेच्या उर्दू शाळांची पटसंख्येत आघाडी
3 कचऱ्यासाठी खतकंपन्या मुंबईकरांच्या दारात
Just Now!
X