ठाण्याच्या घोडबंदर परिसरात रेडीमिक्स काँक्रिट प्रकल्पाला परवाना देण्यास उच्च न्यायालयाने शुक्रवारी ठाणे महापालिकेला मज्जाव केला. अजय जोशी यांनी अ‍ॅड्. गणेश सोवनी यांच्यामार्फत केलेल्या जनहित याचिकेवरील सुनावणीच्या वेळेस न्यायमूर्ती एस. जे. वझिफदार आणि न्यायमूर्ती गौतम पटेल यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले. तीन वर्षे उलटली तरी ठाणे पालिकेने उत्तर दाखल केले नसल्याची बाब शुक्रवारच्या सुनावणीत निदर्शनास आणून देण्यात आली. ते ऐकून संतापलेल्या न्यायालयाने ठाणे पालिकेला धारेवर धरत खरडपट्टी काढली. जर ठाणे पालिकेने उत्तर दाखल केले नाही तर त्यांना या पुढे परवाना देण्याचे अधिकार द्यायचे की नाही हे आम्ही ठरवू, असा सज्जड इशाराही न्यायालयाने या वेळी दिला.  रेडीमिक्स प्रकल्पांना निवासी भागांमध्ये परवानगी देता येते की नाही याचा खुलासा करण्याचे आदेशही न्यायालयाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले.