मुंबई उपनगरीय रेल्वेमार्गावरील प्रवाशांचा शनिवार, रविवारचा प्रवास ‘मेगा ब्लॉक’मुळे खडतर होणार आहे. मध्य रेल्वेवर परळ टर्मिनसच्या कामासाठी २६ जानेवारीच्या मध्यरात्री व रविवारी असे एकूण तीन मेगा ब्लॉक होतील, तर पश्चिम रेल्वेवर २६ जानेवारीच्या रात्री तसेच २ फेब्रुवारी रोजी लोअर परळ उड्डाणपुलाच्या पाडकामासाठी रात्री १० वाजल्यापासून ११ तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे. परळ टर्मिनस व लोअर परळ उड्डाणपुलाच्या कामामुळे लांब पल्ल्याच्या गाडय़ांच्या वेळापत्रकावरही परिणाम होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

आज रात्री परळ टर्मिनसच्या कामांसाठी ब्लॉक..

मध्य रेल्वेमार्गावर नव्या परळ टर्मिनसच्या कामासाठी २६ जानेवारी रोजी अप, डाऊन जलद व धिम्या मार्गावर ब्लॉक होणार आहे.

पश्चिम रेल्वेवर वसई रोड ते वैतरणादरम्यान..

रूळ, ओव्हरहेड वायर इत्यादीच्या कामांसाठी २६ जानेवारी रोजी वसई रोड ते वैतरणादरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. अप जलद मार्गावर रात्री ११.५० ते मध्यरात्री २.५० पर्यंत ब्लॉक होईल.

२७ जानेवारीला माटुंगा ते मुलुंडदरम्यान..

माटुंगा ते मुलुंडदरम्यान डाऊन धिम्या मार्गावर सकाळी ११.२० ते दुपारी ३.५० पर्यंत ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे डाऊन धिम्या मार्गावरील लोकल गाडय़ा माटुंगा ते मुलुंडदरम्यान जलद मार्गावर धावतील.

बदलापूर ते कर्जतदरम्यान..

कर्जतमधील पादचारी पुलाचे गर्डर बसवण्यासाठी बदलापूर ते कर्जतदरम्यान सकाळी १०.३० ते दुपारी २.३० पर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे सीएसएमटी ते पुणे सिंहगड एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे, तर अन्य काही मेल-एक्स्प्रेस दिवा-पनवेल-कर्जतमार्गे वळवण्यात आल्या आहेत.

२ फेब्रुवारी रोजी पश्चिम रेल्वेवर ११ तासांचा ब्लॉक

लोअर परळ उड्डाणपुलाच्या पाडकामासाठी २ फेब्रुवारीच्या रात्री १० पासून ते रविवारी सकाळी ९ पर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे २०५ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.