आमदारांना १००० चौरस फुटांच्या प्रशस्त खोल्या

राज्य शासनाच्या सेवेतील सचिवांच्या तोडीचे पगार मिळवून घेण्यात यशस्वी झाल्यानंतर आता मनोरा आमदार निवासाच्या पुनर्बाधणीत आमदारांना १००० चौरस फुटांच्या सदनिका देण्यात येणार आहेत. त्यापैकी ६०० चौरस फुटांची सदनिका आमदारासाठी व ४०० चौरस फुटांची सदनिका त्यांचे स्वीय साहाय्यक व कार्यकर्त्यांसाठी राहणार आहे. बांधकामाच्या काळात विस्थापित होणाऱ्या आमदारांसाठी दक्षिण मुंबईत एक टॉवर भाडय़ाने घेण्याचे घाटत आहे. विधान भवनात नुकत्याच झालेल्या एका बैठकीत मनोरा आमदार निवास पुनर्बाधणीच्या कामाला वेगाने चालना देण्याचा निर्णय घेण्यात आला.

राज्य विधानसभेचे २८८ व विधान परिषदेचे ७८ असे एकूण ३६६ आमदार आहेत. त्यांच्या मुंबईतील निवासासाठी आकाशवाणी, मनोरा, मॅजेस्टिक व जुने किंवा विस्तारित आमदार निवास आहे. मॅजेस्टिक आमदार निवास धोकादायक जाहीर केल्याने त्या इमारतीत सध्या कुणीही राहात नाही. त्याचबरोबर न्यायालयात एक याचिका दाखल असल्याने त्याची पुनर्बाधणीही करता येत नाही.

आमदारांची राहण्याची चांगली सोय व्हावी, यासाठी मंत्रालयाच्या व विधानभवनाच्या जवळ १९९५ च्या दरम्यान ‘मनोरा’ आमदार निवास बांधण्यात आले. परंतु वीस वर्षांतच ही इमारत खराब झाल्याने ती पाडून त्या जागी नवीन टॉवर बांधण्याचा निर्णय घेण्यात आला.

या संदर्भात दोन दिवसांपूर्वी विधान भवनात बैठक झाली. बैठकीला विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील, मुख्य सचिव सुमित मलिक, विधान मंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मनोरा आमदार निवासाची पुनर्बाधणीचे काम नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशनला देण्याचा या आधीच निर्णय झाला आहे, त्यासंबंधीचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी मुख्य सचिवांकडे देण्यात आली आहे, त्याचा आढावा या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती डॉ. कळसे यांनी दिली.

‘..तर सामुदायिक आदरांजली वाहावी लागेल’

‘मनोरा’सह अन्य आमदार निवासांची दुरवस्था असून आमदार भयाने स्वस्थ झोपूही शकत नाहीत.  दुर्घटना घडली, तर विधिमंडळात सामुदायिक आदरांजली वाहावी लागेल, अशी चिंता शिवसेनेचे आमदार सुभाष साबणे यांनी विधानसभेत व्यक्त केली. आमदार निवासातील समस्यांचा पाढाच त्यांनी वाचला आणि आमदारांना मुंबईत निवासाची चांगली व्यवस्था असावी, अशी मागणी केली.