राज्याचा इतर भागही गारठला, पुढील दोन दिवस तापमानात बदल नाही
गेले दोन दिवस वाढलेल्या तापमानाने मुंबईकरांना थंडीच्या मोसमाचा विसर पाडला होता. पण शनिवारपासून लहरी हवामानाने पुन्हा एकदा गार वाऱ्यांना वाट करून देण्यास सुरुवात केली आणि मुंबईचे १५ अंश सेल्सिअसवर चढलेले तापमान खाली येऊन रविवारी १३ अंश सेल्सिअसवर स्थिरावले. थंडीचा हा मुक्काम आणखी दोन दिवस तरी मुंबईत असणार आहे.
रविवारी सांताक्रुझ येथे किमान १३.२ अंश से. व कमाल ३३.२ अंश से. तापमान नोंदवले गेले. त्यामुळे मागच्या आठवडय़ाप्रमाणेच कोरडय़ा हवेमुळे मुंबईतील किमान व कमाल तापमानातील फरक २० अंश से. इतका झाला आहे. गेला आठवडाभर दररोज संध्याकाळी गारवा तर दुपारी उकाडा अनुभवणाऱ्या मुंबईत शनिवारपासून बाष्पाचे प्रमाण वाढल्याने दुपारीही हवेत गारवा जाणवू लागला आहे.
याशिवाय राज्याच्या इतर भागांतही शनिवारी हवामान कोरडे राहिले. कोकण व गोव्याच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे, तर विदर्भात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली असून राज्यात उर्वरित भागांत तापमान सरासरीच्या जवळपास नोंदले गेले. विशेष म्हणजे मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट कायम असून नाशिक व नांदेड येथे मागील आठवडय़ाप्रमाणेच पुन्हा एकदा ८.५ अंश से. इतक्या किमान तापमानाची नोंद झाली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात पुढील काही दिवस गारवा राहणार आहे. तसेच तापमानात पुढील दोन दिवस फारसा बदल होणार नसून किमान १३ अंश से. ते कमाल ३२ अंश से. इतके तापमान राहणार असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. उत्तर भारतात काही भागांत पावसाच्या हलक्या सरी पडणार असल्या तरी महाराष्ट्रात त्याचा काहीही परिणाम होणार नसून पुढील दोन दिवस मुंबईसह उर्वरित राज्यात आकाश निरभ्र राहणार असल्याचे वेधशाळेचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले.